वर्षा गायकवाड यांचा सवाल

 

मुंबई : मुंबई महापालिकेत लोकनियुक्त सरकार नसताना भाजपा युती सरकार प्रशासकामार्फत महापालिकेची तिजोरी आपल्या कंत्राटदार मित्रांचे खिसे भरण्यासाठी रिकामे करत आहे. भ्रष्ट भाजपा युती सरकार यावर कहर करत शहरातील घनकचरा उचलण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘युजर फी’च्या नावाखाली मुंबईकरांवर नवीन आर्थिक भार टाकण्याचा प्रस्ताव आणत आहे. कचऱ्याचे संकलन करून त्याची विल्हेवाट लावणे हे मुंबई महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य असताना मुंबईकरांवर हा अवाजवी आर्थिक भार का लादता? असा प्रश्न विचारुन काँग्रेसचा अशा कोणत्याही प्रस्तावाला ठाम विरोध आहे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदीनिर्मित महागाई आणि दरवाढीने मुंबईकर आधीच भरडला जात आहे. खाद्यतेल, किराणासह सर्व जिवनावश्यक वस्तू सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीएसटी सारख्या गब्बरसिंग टॅक्सने जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईचा सामना करणाऱ्या मुंबईकरांच्या माथी आणखी आर्थिक बोजा पडला तर त्यांना ते परवडणारे नाही. कचरा संकलनासाठी नागरिकांवर अवाजवी भार लावण्याऐवजी मुंबई महानगरपालिका आणि कंत्राटदारप्रेमी भाजपा युती सरकारने व्यवस्थित घनकचरा व्यवस्थापन करण्यावर आधी लक्ष केंद्रीत करावे, असेही खासदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *