हरिभाऊ लाखे
नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गोदापात्रावरील पुल, मंदिर, घाट परिसरात अमृत कलश ठेवले जाणार असून, या माध्यमातून नदीपात्रात निर्माल्य टाकण्यापासून रोख‌ले जाणार आहे. पर्यावरण विभागाने १२८ अमृत कलश खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी १७.८० लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
नाशिक शहर हे धार्मिक आणि पौराणिक म्हणून ओळखले जाते. यामुळे या ठिकाणी देशभरातूनच नव्हे, तर परदेशातील अनेक पर्यटक, भाविक भेटी देत असतात. यामुळे नाशिक शहराला पर्यटनस्थळाचा दर्जा देखील प्राप्त होऊ लागला आहे. नाशिक शहरातून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीमुळे शहराला अनन्यसाधारण महत्व देखील आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या नदीला प्रदुषणाचा विळखा बसलेला असून, उपनद्या असलेल्या नंदिनी, वाघाडी यांना देखील प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे.
नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने २०१२ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, या समितीकडून प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला जातो. गोदावरी व उपनद्यांवर शहर परिसरात अनेक ठिकाणी पूल उभारण्यात आले आहेत. या पुलांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नदीपात्रात निर्माल्य तसेच अनेकदा केरकचरा व प्लास्टिक सुध्दा टाकले जाते. रामकुंड परिसरात तसेच विविध घाटांवर देखील भाविक व पर्यटकांकडून नदीपात्रात निर्माल्य टाकले जाते. यामुळे हे निर्माल्य नदीपात्रात पडण्याऐवजी ते अमृत कलशमध्ये टाकले जावे या उद्देशाने मनपाच्या गोदावरी संवर्धन व पर्यावरण विभागामार्फत १२८ अमृतकलश खरेदी केले जाणार आहेत.
निर्माल्यासाठी स्वतंत्र घंटागाड्यांची मागणी
गोदाघाटावर ठेवण्यात येणाऱ्या अमृत कलशात निर्माल्यादी कचरा टाकला जाणार आहे. या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी दोन ते तीन स्वतंत्र घंटागाड्याची व्यवस्था करण्याची मागणी पर्यावरण विभागातर्फे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे केली जाणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *