मुंबई : १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागीच वाहन जप्त करुन पोलिसांनी ताब्यात घ्यावे, असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्याने देण्यात आले आहेत. या शिवाय मालवाहतुकीसाठी २० वर्षे ही वयोमर्यादा असून ती सक्तपणे पाळण्यात यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय ई-चलनाबाबतही आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे.
वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. सुरेशकुमार मेकला यांनी हे परिपत्रक जारी केले आहे. ई-चलन जारी करणे आणि दंडात्मक वसुली तसेच वाहन जप्तीबाबत ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास पोलिसांकडून वाहन ताब्यात घेतले जाते. संबंधित चालकाच्या पालकांना वा संबंधित व्यक्तीला पाचारण केले जाते. चालक तसेच पालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. आता नव्या परिपत्रकानुसार पोलिसांना वाहन जप्तीचीही कारवाई करावी लागणार आहे.
ई-चलनाबाबत जारी करण्यात आलेल्या कार्यप्रणालीनुसार, तडजोडपात्र आणि विनातडजोड असे ई-चलनाचे दोन प्रकार आहेत. तडजोडपात्र ई-चलन प्रकरणात दोषी व्यक्तीने स्वखुशीने रक्कम भरण्याची तयारी दाखवल्यास सक्षम पोलीस अधिकाऱ्याने रक्कम स्वीकारून ई-चलनाचा निपटारा करावा, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र संबंधित व्यक्ती तडजोड रक्कम भरण्यास तयार नसल्यास अशा प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावेत.
विना-तडजोड प्रकरणात तात्काळ दोषारोषपत्र जारी करण्याचे आदेश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्ती हजर न राहिल्यास वाहन जप्त करता येते. मात्र त्यासाठी न्यायालयातून रीतसर परवानगी घेऊन वाहन जप्त करण्यात यावे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्याशिवाय वाहन परस्पर जप्त करू नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. पोलिसांकडून जबरदस्तीने वाहन जप्तीसारखे प्रकार केले जात असल्यामुळेच राज्य पोलिसांकडून नव्याने परिपत्रक जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या परिपत्रकाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाणार आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *