जाकिरभाई गेले, यावर विश्‍वास बसणे कठीण आहे. त्यांना मी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून ओळखतो. प्रथम ऐकले तेव्हा त्यांचे वय अवघ्या पाच वर्षांचे होते आणि तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. भेटीचा तो प्रसंग गिरगावातील एक कार्यक्रमाचा होता. त्या काळी बैठकीची अतिशय प्रसिद्ध जागा असणार्‍या लक्ष्मीबाग भटवाडीमध्ये उस्ताद थिरकवा साहेबांच्या गुरुंची पुण्यतिथी साजरी होत असे. त्यानिमित्ताने अल्लारखा साहेब पाच वर्षांच्या जाकिरला घेऊन आले होते. पण इतक्या लहान वयातही जाकिरने असे काही वाजवले होते की, ऐकणारे मंत्रमुग्ध झाले. त्या वयातही प्रेक्षकांना, जाणकारांना आपल्याकडे खेचून घेण्याची त्यांच्यातील अफाट ताकद स्पष्ट जाणवली होती. तीच या वर्षीच्या जुलै महिन्यात 73 व्या वर्षी सादर केलेल्या कार्यक्रमातही कमी झालेले नव्हती हे विशेष. त्यांच्या ऊर्जेत कधीच तीळमात्र फरक दिसला नव्हता. वेळेनुसार ज्ञान वृद्धिंगत होते. तसे त्यांचे ज्ञान वृद्धिंगत तर होतच राहिले परंतु, वाढत्या वयाप्रमाणे ऊर्जाशक्ती कमी होण्याचा नियम मात्र त्यांना कधीच लागू पडलेला दिसला नाही. असा हा थोर कलाकार आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख खूप मोठे आहे.
त्यांच्या आठवणी किती सांगाव्या…! मला भावणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांचे कलेतील समर्पण. इथे मी समर्पण हा शब्द अगत्याने वापरतो आहे. कारण कला मनुष्याच्या ऊर्मीतून येते. मात्र याची दुसरी आणि नकारात्मक बाजू ‘मी हे करतोय’ अशा अहंगडाचीही असते. एकदा कलाकारामध्ये हा दंभ जाणवू लागला की अभिमान, गर्व आदी अनेक गोष्टी सहजी येऊ लागतात आणि कलाकार त्यात वाहवत जाऊ लागतो. मात्र जाकिरभाईंच्या व्यक्तिमत्त्वाला कधी अशा नकारात्मकतेचा साधा स्पर्शही झाला नाही. त्यामुळेच एकाअर्थी ते समर्पणात्मक आयुष्य जगले. आपल्याला मिळालेली प्रसिद्धी, पैसा, वलय यातील कशाचाही अभिनिवेश त्यांच्यामध्ये दिसला नाही. त्यांच्याकडून प्रत्येक कलाकाराने शिकावी अशीच ही गोष्ट म्हणावी लागेल. अत्युच्च पदावर गेल्यानंतरही जमिनीशी कसे जोडलेले राहता येते, हे त्यांच्याकडे बघून वेळोवेळी शिकायला मिळाले.
कलेत तर हा माणूस अत्युच्चपदी होता. एखाद्याला अचंबित करणारी गोष्ट त्यांच्या हातून इतक्या सहजतेने निघून जायची की आपल्याला ती अद्याप का बरे जमत नाहीये… असा अनेकजण विचार करत बसायचे. एकीकडे हे सगळे असतानाही त्यांच्या चेहर्‍यावर मात्र अत्यंत निरागस भाव असायचे. माझ्या मते, या साधेपणा आणि निरागसतेमध्येच त्यांच्या कलेचे मोठेपण भिजले होते. असे निरलस व्यक्तिमत्त्व शतकामध्ये क्वचितच घडते.
तबलावादनामध्ये सहा घराणी आहेत. या सगळ्यांवर जाकिरभाईंचा अधिकारात्मक दृष्टीक्षेप होता. त्यांना प्रत्येक घराण्याची मर्मस्थाने नेमकेपणाने माहिती होती आणि ती ते इतक्या ताकदीने प्रदर्शित करायचे की त्या त्या घराण्याच्या तबलावादकाला हे आपल्या घराण्यातील रचना वाजत असल्याचा सार्थ अभिमान, कुतूहल आणि त्याचबरोबर आश्‍चर्यही वाटायचे. हे इतके सगळे कसे काय करु शकतात? अशीच ऐकणार्‍या जवळपास प्रत्येकाची भावना असायची. मुख्य म्हणजे आधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रभुत्वाचा अभिनिवेश नसणे ही फार मोठी बाब होती. मला कायमच याचे नवल वाटत राहिलेले आहे. त्यांची प्रदीर्घ कारकीर्द पाहता वाटते की, तबल्याला समर्पित असणारा हा काही त्यांचा एकच जन्म नव्हता. त्यांचा मागील जन्मही तबल्यासाठीच राहिलेला असेल कारण एका जन्मात एवढे जमणे अवघड आहे. भारतीय अभिजात संगीत परंपरेशी निगडित आहे. मात्र ती जपतानाच त्यांनी नवनवीन प्रयोगातही काही कमी ठेवले नाही. नवनिर्मितीमध्येही ते कायम अग्रेसर राहिले. जगाने दाद घ्यावी अशी नवनिर्मिती त्यांनी केली. तबला आणि इतर वाद्ये, तबला विथ मृदंग, तबला विथ वेस्टर्न ड्रम, तबला विथ गाणे, तबला विथ द्रुपद गायकी, तबला विथ कर्नाटक संगीत, तबला विथ पाश्‍चिमात्य संगीत असे सगळ्या प्रकारचे प्रयोग त्यांनी केले. त्यांनी केलेल्या प्रत्येक प्रयोगाची नक्कल करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरला नाही. यापेक्षा एखाद्या कलाकाराच्या अभिव्यक्तीला, प्रयोगशीलतेला मिळणारी उत्तम दाद ती कोणती…! त्यांनी केलेल्या अशा बहुढंगी प्रयोगांमुळे, अफाट कामामुळे अनेक तबलावादकांचे चरितार्थ व्यवस्थित चालायला लागले. ही अतिशयोक्ती नव्हे तर वास्तव आहे. केवळ तबलावादकांचेच नव्हे तर तबल्याच्या परीघात येणारे कारागीर, संगीतकार, साथ करणारे, सोलो वादक, खुद्द जाकिरभाईंना साथ करणारे वादक अशा सर्वांमध्ये जाकिरभाई डोकावले नाहीत, असे कधी होत नाही. त्यांच्याकडून प्रेरणा घेत तबला शिकणार्‍यांची संख्या किती मोठी असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
माझे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. सांगायला लागलो तर यादी कितीही मोठी होऊ शकेल. या वर्षीच्या प्रारंभी ते पत्नीसह आमच्याकडे भोजनास आले होते. त्यांच्या सहवासात गेलेले चार-पाच तास आज प्रकर्षाने आठवत आहेत. आमच्या घरातील पुढच्या पिढीला त्यांनी भरभरुन आशीर्वाद दिले होते. केवळ आमच्याच कुटुंबातील कलाकारांचा नव्हे तर नव्या पिढीतील चांगले काम करणार्‍या अनेक कलाकारांचे उल्लेख ते आपल्या बोलण्यात वेळोवेळी करत असत. तबलावादक यशवंत, योगेश समसी, अनुब्रत चटर्जी आदी कलाकारांचा उल्लेख करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात, प्रोत्साहन देण्यात त्यांनी कधीच काटकसर केली नाही. मुख्य म्हणजे या सगळ्यात कृत्रीमतेचा मागमुसही नसायचा. घरातील ज्येष्ठाने करावे तितक्या सहजतेने ते वादकांचे, चांगल्या कलाकारांचे कौतुक करत असत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही बाबही भावणारी होती.
शेवटी प्रसिद्धी मिळणे कठीण असतेच पण त्यापेक्षाही ती टिकवणे अधिक आव्हानात्मक असते. कारण ती डोक्यात जाणे अगदी स्वाभाविक आहे. 99 टक्के लोक याला बळी पडतात. पण उरलेल्या एक टक्क्यामध्ये जाकिरभाईंचे नाव अग्रक्रमावर आहे. खासगीतही ते वर्षभराने मोठ्या असणार्‍या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करुन आशीर्वाद घ्यायचे आणि हजारांच्या समुदायासमोर ही कृती करतानाही त्यांना कधी संकोच वाटायचा नाही. त्यांच्या या कृतीतून केवढे तरी शिकण्यासारखे आहे. मुळात कलाकाराला एवढे ‘वाकता’ येणे, हीच खूप मोठी बाब आहे आणि आपल्या सर्वांसाठी ही मोठी शिकवणही आहे. प्रसिद्धीच्या वलयात राहूनही वृत्तीतला साधेपणा आणि मातीतले पाय जपणारा असा माणूस आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना विनम्र आदरांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *