किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
मुंबई : महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षांखालील किशोर-किशोरी मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२४-२५ ला आज माटुंग्यात सुरुवात झाली. स्पर्धेचे आयोजन ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, माटुंगा (प.), मुंबई – ४०००१६ येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिराचे विश्वस्त उमेश नरवणे (सी.ए.), अॅड. अरुण देशमुख, उपाध्यक्ष बाळ तोरसकर, प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत तरळ, कार्याध्यक्ष सुधाकर राऊळ, कार्योपाध्यक्ष विकास पाटील, प्र. कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई आणि ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरचे प्रशिक्षक नितीन पाष्टे हे मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रमुख सामने आणि निकाल
आज सर्व सामने किशोरीचे झाले. किशोरींच्या ओम साईश्वर सेवा मंडळ ने सरस्वती कन्या संघाचा ९-२ (९-१-१) असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. या सामन्यात ओम साईश्वरच्या वीरा मयेकर (४ मि. संरक्षण व ३ गुण), यशस्वी कदम (४ मि. संरक्षण व २ गुण), आर्या जाधव (नाबाद ३ मि. संरक्षण व २ गुण) यांनी केलेल्या खेळापुढे सरस्वती कन्या संघाचा निभाव लागला नाही.
किशोरींच्या दुसऱ्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने आर्य सेनेचा ९-४ (९-२-२) असा १ डाव ५ गुणांनी पराभव केला. शिवनेरी तर्फे गार्गी कडगेने ४:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. गौरांगी पेडणकरने आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. इमला बोऱ्हाडेने ३:२० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. आर्यसेनेतर्फे आरुषी परवडीने नाबाद १:५० संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. दिक्षिता घोलपने १ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला.
किशोरींच्या तिसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने वैभव स्पोर्ट्स क्लबचा (१७-२-३) १७-५ असा १ डाव १२ गुणांनी पराभव केला. श्री समर्थतर्फे सोनम शेलारने नाबाद २ मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. युक्ता पटेलने २:३० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. स्नेहा कांबळेने १:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. वैभवतर्फे मेघदा देवळेकरने १:१०, १:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले.
किशोरींच्या चौथ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ॐ समर्थ व्यायाम मंदिराचा (९-१-१) ९-२ असा १ डाव ७ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे कादंबरी तेरवणकरने ४:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात १ खेळाडू बाद केला. वीरा मयेकरने ४:५० मिनिटे संरक्षण केले. आर्या गोरिवलेने नाबाद २:५० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. ॐ समर्थतर्फे खेळाडूने चांगला प्रतिकार केला.