जालना : मराठा आरक्षणासाठी मागणी करणारे मनोज जरांगे यांच्या बहुचर्चित सामुहिक उपोषणाचा मुहुर्त अंतरवाली सराटीमध्ये उद्या मंगळवारी १७ डिसेंबरला सकाळी 11 वाजता ठरणार आहे. स्वता जरागे या सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत. छगन भुजबळांना राज्याच्या मंत्रिमंडळातून डावल्याच्या गोष्टीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याला मंत्रिमंडळात का घेतलं नाही याच्याशी आमचं काही देणं-घेणं नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला देणं घेणं नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. छगन भुजबळांवर एका वाक्यात प्रतिक्रिया देत मनोज जरांगे यांनी तो विषय टाळला.
ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं. उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नसून सामूहिक आमरण उपोषणाला जरी कोणी नाही बसलं, तरी आपण बसणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं.
सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षा जरांगेंनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी देखील जरांगे यांनी केली.
जरांगेंना अंगावर घेतलं म्हणून मंत्रिपद नाकारलं
जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस म्हणून मंत्रिपद नाकारलं गेलं असा आरोप करत छगन भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, तरी भुजबळ संपला नाही असंही छगन भुजबळ म्हणाले. मी सामन्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, काय फरक पडतो असंही ते म्हणाले. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं. असं सांगत आपण अजित पवारांशी चर्चा केली नसल्याचं भुजबळ म्हणाले.