बदलापुरात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
बदलापूर: सोमवार हा मोसमातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूर शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद खाजगी हवामान अभ्यासाकांनी केली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास बदलापुरात १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले तर शेजारच्या अंबरनाथमध्ये ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान १२ अंश सेल्सिअस होते.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्यात ठाणे जिल्ह्यात तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात बदलापूर शहरात १०.४ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदवले गेले. खाजगी हवामान अभ्यासात अभिजीत मोडक यांनी त्यांच्या केंद्रात ही नोंद नोंदवली.
बदलापूर शहराच्या एका बाजूला टाहुलीची डोंगर रांग तर दुसऱ्या बाजूला उल्हास नदी आहे. शहरात मोठ्या संख्येने झाडे आहेत. त्यामुळे शहरात जिल्ह्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद दरवर्षी होत असते. यंदा सोमवारी आतापर्यंतच्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. बदलापूर शेजारच्या अंबरनाथ शहरात ११.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. उल्हासनगर शहरात १२.५ अंश सेल्सिअस, कल्याण शहरात १२.८ अंश सेल्सिअस, डोंबिवली शहरात १२ अंश सेल्सिअस तर ठाणे शहरात १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.