आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता
ठाणे : जिल्ह्यातील भिवंडी शहरातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औषध प्रशासनाने एक कोटी ८५ लाख रुपयांचा साठा जप्त केला असून ही औषधे अँटिबायोटिक (प्रतिजैविक) असल्याचे प्रशासनाने सांगितले. या प्रकरणी औषध प्रशासन विभागाकडून नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आंतरराज्यीय टोळी यामध्ये सहभागी असून त्यादिशेने औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बनावट औषधांप्रकरणी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले आहेत. या बनावट औषधांचा साठा सरकारी रुग्णालयांमध्येही विक्री झाल्याचे उघड झाले होते. भिवंडीमधील एका गोदामामध्येही बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती औषध प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या औषधांचा साठा विक्रीस प्रतिबंधित केला होता. या औषधांचे नमुने तपासल्यानंतर ते बनावट आढळून आले. त्यानंतर पथकाने एक कोटी ८५ लाख रुपयांच्या बनावट औषधांचा साठा जप्त केला. याप्रकरणात औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट औषधांची विक्री रुग्णांनाही झाली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय टोळी कार्यरत असून त्यादिशेने औषध प्रशासनाचा तपास सुरू आहे.
00000