आंबेडकरी संघटनांची ठाण्यात जोरदार निदर्शने

 

अनिल ठाणेकर
ठाणे : परभणी येथे डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली.
परभणी येथे एका समाजकंटकांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती. तसेच, तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती. त्यानंतर सबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणी सोमनाथ सुर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली . पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आले असल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, पीआरपीचे जिल्हा महासचिव शंकर जमदाडे , पीआरपीच्या महिलाध्यक्षा मीनाताई अलिंग, संदीप खांबे , प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी, सोमनाथ सुर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे. पोलिसी मारहानीमुळेच सोमनाथ दगावला आहे. याची चौकशी करून पोलीस अधीक्षक,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे; पुतळ्यावर दगडफेक करणार्यामागील मास्टर ऑफ माईंडचा शोध घ्यावा; अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,  असा इशारा दिला. तर, आबासाहेब चासकर यांनी, सोमनाथ  सुर्यवंशी याचा मृत्यू नसून खूनच झालेला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत. जर, सोमनाथच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर राज्यभर जनक्षोभ उसळेल, असा इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *