सिंधुदुर्गात १९ डिसेंबरला जनसुनावणी…!
सिंधुदुर्गनगरी : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ‘महिला आयोग आपल्या दारी हा एक अत्यावश्यक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारीबाबतची जनसुनावणी येत्या१९ डिसेंबरला जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे या तक्रारी ऐकून सुनावणी घेणार आहेत.
जिल्ह्यातील या जन सुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात असे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या तक्रारी मांडल्यानंतर त्यांच्या तक्रारीचे लगेचच निवारण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठकही घेण्यात येणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रारी करणे,सुनावणीच्या तारखेला प्रत्यक्ष उपस्थित रहाणे बरंचदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊनच हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
रत्नागिरीत १८ डिसेंबरला आयोगाच्या वतीने अशाच प्रकारचा उपक्रम बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी हाती घेण्यात आला आहे.