बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाच्या युवक सरपंचांचा निर्घुनपणे खून करण्यात आल्यानंतर आज त्याचे पडसाद विधीमंडळ आणि संसदेतही उमटले. दरम्यान सरपंचाच्या हत्येच्या तपासासाठी सीआयडी बीडमध्य दाखल झाली आहे.
या प्रकरणाच्या तपासाला आता गती प्राप्त झाली असून सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल झाले आहे. सीआयडीचे आयपीएस अधिकारी सचिन पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सात दिवस पूर्ण होत आहेत. तर विरोधकांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासन हे सतर्क झाले आहे. सीआयडीचे पथक दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहे. सीआयडीचे संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर, बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन देखील करण्यात आले. दुसरीकडे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर, आज संसंदेच्या हिवाळी अधिवेशनात बजरंग सोनवणे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे, हे प्रकरण आणखी गंभीर होत चाललं आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये एसआयटी नेमण्यात आली असून सीआयडीची टीम देखील मस्साजोग गावात पोहोचली आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संसद सभागृहात बजरंग सोनवणे यांनी चर्चा केली, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही, असे म्हणत या प्रकरणातील जे मारेकरी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आजच राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळ सभागृहात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.. बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे. त्या प्रकरणात वॉचमनने एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. पोलीस सहकार्य करण्याऐवजी आरोपींना मदत करत आहेत. आरोपी बाहेर फिरत आहेत. ज्या आरोपीने खून केला त्याचे पोस्टर लावले जातात. बाप तो बाप है म्हंटलं जातंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक तालुका अध्यक्ष यात आहे. तीन गुन्हेगार राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. एक मंत्री आहेत त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक अण्णा नावाची ती व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने या प्रकरणात फोन केले आहेत, असे म्हणत थेट धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचं नाव दानवेंनी घेतलं आहे.