अनिल ठाणेकर
ठाणे : शहराच्या मनोरमा नगर या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात, आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांकडून उभारण्यात आलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची अत्यंत दुरवस्था झाली असून, संस्कार केंद्राची अनेक महिने स्वच्छता न केल्याने, पालापाचोळा आणि कचरा साचल्यामुळे, साहजिकच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा एकप्रकारे अवमान असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे, ६ डिसेंबर या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या दिवशीदेखील, संबंधित संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांचे याठिकाणी दुर्लक्ष झालेले असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. मनोरमा नगरमधील श्रुती पार्क कॉम्प्लेक्सच्या शेजारी असणाऱ्या, ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसथांब्याला लागुनच हे संस्कार केंद्र असून, आधीच फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे आणि त्यांच्याकडून होणाऱ्या भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मनोरमा नगरमध्ये वास्तव्यास असणारे आंबेडकरी चळवळीतील पत्रकार आणि ‘लोकमित्र’ दैनिकाचे संपादक कुणाल बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, या संस्कार केंद्राशी संबंधित असणाऱ्यांचा, बाबासाहेबांच्या विचारांशी कोणताही संबंध नसून, निव्वळ बॅनरवर झळकून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी झटणारे ते कार्यकर्ते असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. सध्या ठाणे शहराच्या विविध भागांत, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ‘ईव्हीएम’विरोधी जनजागृती मोहीम व “जनमत-चाचणी” सुरु करण्यात आलेली असून, त्याच अनुषंगाने सोमवार, १६ डिसेंबर-२०२४ रोजी, मनोरमा नगर येथे, पक्षाध्यक्ष राजन राजे यांच्या प्रमुख उपस्थितीत, मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचे आवाहन, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून परिसरातील नागरिकांना केले जात असताना, याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राच्या एका कार्यकर्त्याने, याठिकाणी बांधण्यात आलेला ‘धर्मराज्य पक्षा’च्या घोषणांचा फलक, जो कार्यक्रम संपेपर्यंत ठेवण्यात येणार होता, तो दादागिरी करुन काढायला लावला होता. यासंदर्भात, पत्रकार कुणाल बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, मतदानाचा अधिकार हा, बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार असून, त्याचा प्रसार करणारा फलक लावण्यास संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्याने आक्षेप घेणे, ही लाजिरवाणी घटना असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. एकेठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली संस्कार केंद्राची उभारणी करायची आणि दुसरीकडे त्याची स्वच्छता न राखता, उलट लोकशाहीमार्गाने जनजागृती करणाऱ्या ‘धर्मराज्य पक्षा’च्या कार्यकर्त्यांवर अरेरावी करायची, ही संस्कृती नसून, विकृती असल्याचे तिखट प्रतिक्रिया पत्रकार कुणाल बागुल यांनी, याप्रकरणी दिली आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *