एखाद्या व्यक्तीवर एखाद्या प्रसंगाचा इतका परिणाम होतो, की त्या क्षणी तो जगावेगळे काहीतरी करण्याचा संकल्प मनाशी ठरवतो. आपल्या आदर्शाचा कुणी पराभव करीत असेल, तर त्याच वेळी आपल्या आदर्शासारखे होऊन आदर्शाचा पराभव करणाऱ्याचा पराभव करण्याची खूणगाठ मनाशी बांधतो. तेवढ्यावर ती व्यक्ती मग थांबत नाही. ध्येयाचा पाठलाग करू लागते. अर्जुनाला जसा माशाचा डावा डोळाच दिसत होता, तसे अशा ध्येयवेड्यांना फक्त इप्सितच दिसत असते. इतर कशाचेही त्यांना भान राहत नाही. झपाटून गेलेल्या व्यक्तीच असाध्य ते साध्य करू शकतात. डोम्माराजू गुकेश हा अशाच व्यक्तीपैकी एक. गेल्या गुरुवारीच त्याने बुद्धिबळावर आपले नाव कोरले. खरेतर त्याची लगेच दखल घ्यायला हवी होती; परंतु राज्य, देश आणि जगात इतक्या महत्त्वाच्या घटना घडल्या, की गुकेश याचे यश झाकोळले गेले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी बुद्धिबळाचा विश्वविजेता बनणे, ही देशासाठी फार मोठी कामगिरी आहे. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूने कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळात अशी कामगिरी केलेली नाही. गुकेशचे हे यश अभूतपूर्व आहे. कारण विश्वनाथन आनंद जेव्हा विश्वविजेता बनला, तेव्हा त्याचे वय ३१ वर्षे होते. २०१३ मध्ये जेव्हा आनंदने विजेतेपद गमावले, तेव्हा गुकेशने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तो २०१९ मध्ये वयाच्या १२ वर्षे आणि सात महिन्यांत दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला. चार वर्षांत तो जगज्जेता झाला. त्याचा हा विक्रम चमत्कारापेक्षा कमी नाही. गुकेश जेव्हा ग्रँडमास्टर झाला नव्हता, तेव्हा त्याने सांगितले होते, की त्याला सर्वात तरुण बुद्धिबळ जगज्जेता व्हायचे आहे. एखाद्याचा आपल्या क्षमतेवर किती विश्वास असावा, हे त्याच्या या वक्तव्यातून दिसते. त्याने केवळ चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पाहिले नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नही केले. यात त्याच्या आई-वडिलांचाही मोठा वाटा आहे. त्यांनी आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे जे शक्य होते, ते ते सर्व केले. गुकेशच्या यशाचे महत्त्व जास्त आहे. कारण त्याच्याआधी जगात कोणीही इतक्या कमी वयात बुद्धिबळाचा विश्वविजेता बनला नव्हता. त्याच्या आधी गॅरी कास्पारोव हा युवा विश्व बुद्धिबळ चॅम्पियन होता. गॅरी जेव्हा विश्वविजेता बनला, तेव्हा तो २२ वर्ष सात महिन्यांचा होता. गुकेशने इतिहास रचला. या कारणास्तव त्याची गणना जगभरातील इतर खेळाडूंमध्ये केली जाते, ज्यांनी लहान वयातच करिष्मा दाखवला आहे. गुकेशचे यश म्हणजे नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यासारखे आहे.
लहान वयात महान गोष्टी करणाऱ्या गुकेशला बक्षीस म्हणून १.३५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ११.४५ कोटी रुपये मिळतील. सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपची एकूण बक्षीस रक्कम २.५ दशलक्ष डॉलर (२१.२ कोटी रुपये) होती. ही मोठी रक्कम बुद्धिबळाच्या लोकप्रियतेचे प्रमाण सांगते. बुद्धिबळ हा भारतात आणि विशेषत: उत्तर भारतात तितका लोकप्रिय खेळ नसला, तरी फुटबॉलनंतर हा जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तो सुमारे २०० देशांमध्ये खेळला जातो. गुकेशच्या रूपाने भारताकडे आता मोठी यशोगाथा असल्याने, देशात या खेळाची लोकप्रियता वाढण्याची शक्यता अधिक आहे. यशोगाथा प्रत्येकाला आणि विशेषत: मुलांना आणि तरुणांना प्रेरणा देतात. बुद्धिबळाबद्दल असे म्हटले जाते, की त्याचा शोध भारतात लागला. अलीकडच्या काळात गुकेश, अर्जुन इरिगेसी, पी. हरिकृष्ण, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराती आदींनी बुद्धिबळ पुन्हा भारतात रुजत असल्याचे दाखवून दिले आहे. नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले. १८ वर्षीय गुकेशने ३२ वर्षीय चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनचा ६.५ विरुद्ध ७.५ गुणांसह पराभव केला. पहिला सामना हरला असला, तरी तिसरा सामना जिंकण्यात तो यशस्वी ठरला. यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सने सात ड्रॉ खेळले. त्यानंतर गुकेशने ११वा सामना जिंकला. यानंतर चिनी ग्रँडमास्टरने १२वा सामना जिंकला. १३वा गेम पुन्हा अनिर्णित राहिला. गुकेशने १४ वा गेम जिंकून विजेतेपद पटकावले. हा सामनाही अनिर्णित राहिला असता, तर टायब्रेकरने विजय निश्चित झाला असता. सर्वोत्कृष्ट १४ फॉरमॅटमध्ये विजय मिळवणारा गुकेश तिसरा ग्रँडमास्टर ठरला. त्याच्याआधी डिंग लिरेन आणि मॅग्नस कार्लसन यांनी अशी कामगिरी केली होती. चीनी खेळाडूला कमी लेखता येणार नाही, हे दोन ग्रँडमास्टर्समधील निकराच्या लढतीने दिसून आले. बुद्धिबळाच्या खेळात संयम आणि मानसिक कणखरपणा खूप महत्त्वाचा आहे आणि गुकेशने इतक्या लहान वयात आपण मानसिकदृष्ट्या मजबूत असल्याचे सिद्ध केले. हीच ताकद त्याच्या यशाचे कारण ठरली. त्याच्या यशामागे त्याचे स्वतःचे समर्पण आणि परिश्रम तर होतेच; पण त्याच्या टीमचा पाठिंबाही होता. विश्वनाथन आनंद त्याच्या संघाचा भाग नसला, तरी इतर भारतीय बुद्धिबळपटूंप्रमाणे तोही त्याचे प्रेरणास्थान आहे. गुकेश विश्वनाथन आनंदच्या बुद्धिबळ अकादमी वेस्टब्रिजचा भाग आहे आणि त्याच्याकडून बुद्धिबळाच्या अनेक युक्त्या शिकल्या आहेत. आनंदच्या यशाने ज्याप्रमाणे भारतातील अनेक खेळाडूंना बुद्धिबळात काहीतरी करण्याची प्रेरणा दिली, त्याचप्रमाणे गुकेशही तेच करणार आहे आणि कदाचित त्याहूनही अधिक प्रभावीपणे. कारण त्याने यापूर्वी कोणीही जे केले नाही, ते साध्य केले आहे. गुकेशने बालपणीच आपली प्रतिभा दाखवली होती; पण त्याचा अलीकडचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चेन्नई येथे सुपर ग्रँडमास्टर स्पर्धा झाल्यामुळे गुकेश स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला. गुकेशला टोरंटोला नेण्यासाठी ही स्पर्धाच उपयुक्त ठरली. बुद्धिबळातील भारतीय खेळाडूंच्या यशासाठी देशात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन होत राहणेही आवश्यक आहे. वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप २०२४ च्या निर्णायक सामन्यात, चीनचा डिंग लिरेन पांढऱ्या मोहरांसह खेळत होता आणि गुकेश काळ्या मोहरांसह खेळत होता. ५३व्या चालीवर डिंग लिरेनचे लक्ष विचलित झाले आणि त्याने चूक केली. डी गुकेशने पुन्हा लिरेनला पुनरागमनाची संधी दिली नाही आणि अखेर गतवर्षीच्या विश्वविजेत्याचा पराभव करून सामना जिंकला. डी गुकेश चेन्नईचा रहिवासी आहे. त्याने वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले. गुकेश आनंद बुद्धिबळ अकादमी येथे प्रशिक्षण घेतो. गुकेशने वयाच्या १७ व्या वर्षी फिडे बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली. अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याच वेळी, या वर्षी बुडापेस्टमध्ये १० ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात भारत चॅम्पियन ठरला. खुल्या गटात गुकेशनेच अंतिम सामना जिंकून भारताला विजय मिळवून दिला. करिअरमधील काही प्रमुख यश गुकेशने अगदी लहान वयातच सिद्ध केले आहे. तो भविष्यात एक उत्तम बुद्धिबळपटू होईल. गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून हे सिद्ध केले. चेन्नई येथे नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत ६४ दिग्गज खेळाडू आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. तब्बल १९ दिवस चाललेली ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेक बुद्धिबळप्रेमीही आले होते. त्यांच्यामध्ये एक हाडकुळा सात वर्षांचा मुलगा होता. त्याने तत्कालीन चॅम्पियन विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात विजेतेपदासाठी लढत पाहिली होती. या स्पर्धेतील कार्लसनचा विजय या मुलाच्या हृदयात आणि मनावर इतका खोलवर रुजला होता, की एक दिवस आपणही बुद्धिबळाचा बादशहा बनू, असे त्याने ठरवले. एका दशकापासून पूर्ण जोमाने आणि उत्साहाने तयारी करत असलेले हे मूल दुसरे तिसरे कोणी नसून १८ वर्षांचे डोम्माराजू गुकेश म्हणजेच डी गुकेश आहे. तो आक्रमक, बचावात्मक आणि शांत चाली खेळण्यात पटाईत आहे.
या मुलाने आपले बालपण सामान्य मुलांसारखे जगले नाही. खेळात थोडे अंतर पडल्यावर इतर खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये येतात; पण एक सामना संपताच गुकेश पुढच्या तयारीला लागतो. इतर खेळाडू बहुतेक संगणकावर अवलंबून असतात, तर गुकेश संगणकाची मदत घेण्यासोबतच स्वतःच्या रणनीतीवर अधिक अवलंबून असतो. २०२२ मध्ये चेन्नई येथे झालेल्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये टॉप बोर्डवर खेळणारा गुकेश हा एकमेव भारतीय खेळाडू होता. त्याने येथे सुवर्णपदक जिंकले तर कार्लसनने कांस्यपदक जिंकले. पुरस्कार वितरणादरम्यान, गुकेशला सुवर्णपदक दिले जात असताना कार्लसन पदक घेण्यासाठी व्यासपीठावर पोहोचला नाही. ही स्पर्धा गुकेशच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली.
एप्रिल २०२४ मध्ये टोरंटो येथे आयोजित फिडे बुद्धिबळ विजेतेपद जिंकून, गुकेशने रशियाच्या गॅरी कास्परोव्हचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. कास्पारोव्हने वयाच्या २० व्या वर्षी फिडे किताब जिंकला, तर गुकेशने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ही कामगिरी केली. आता तो सर्वात कमी वयात ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनणारा पहिला खेळाडू ठरला आहे. कास्पारोव्ह १९८५ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी जगज्जेता झाला, तर गुकेश वयाच्या १८ व्या वर्षी जगज्जेता झाला. गुकेशने विश्वनाथन आनंद आणि कार्लसन यांसारख्या बुद्धिबळ पंडितांचे भाकीतही फिडे किताब जिंकून चुकीचे सिद्ध केले. आनंद म्हणाला होता, की २०२६ पर्यंत फिडे बुद्धिबळ स्पर्धा क्वचितच कोणी भारतीय जिंकेल; पण गुकेशने केवळ फिडेच नाही, तर वर्ल्ड चॅम्पियनशिपही जिंकली.