मुंबई : संविधान बदलाचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा खासदार वर्षा गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला. काँग्रेसचे रक्त देशाची एकता व अखंडतेसाठी या मातीत सांडले आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत झाशीची राणी, मंगल पांडे, टिपू सुलतान, चंद्रशेखर आझाद यांच्यासह अनेक विरांचे रक्त सांडले आहे. खरा सर्जिकल स्ट्राईक इंदिराजी गांधी यांनी करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले व स्वतंत्र बांग्लादेश निर्माण करण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. असे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
लोकसभेत पुरवणी मागण्यांच्या चर्चेत बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याचे पुतळे काही लोक बनवतात आणि त्या हत्याऱ्याची जयंतीही साजरी करतात हे अत्यंत चुकीचे आहे, हे लोक कोण आहेत हे देशाला माहित आहे. देशात शांतता राहिली पाहिजे, तामिळनाडूत शांतता राहिली पाहिजे हे लक्षात घेऊन राजीव गांधी यांनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवली होती. राजीव गांधी स्वतः श्रीलंकेत शांतीचा संदेश घेऊन गेले होते. एक वर्षापासून मणिपूर जळत आहे परंतु देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरला जायला वेळ नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मुंबईत आले होते, ते ज्या घाटकोपर भागातून गेले तेथे दोन दिवसापूर्वीच एक दुर्घटना होऊन काही लोक जखमी झाले होते पण पंतप्रधानांनी त्या जखमींना भेटून त्यांचे सांत्वनही केले नाही एवढे असंवेदनशिल पंतप्रधान आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सरकारने गरिबांची मदत केली पाहिजे पण दुर्दैवाने आज त्याच्या उलटे होत आहे. भाजपा सरकार मूठभर श्रीमंत लोकांचा फायदा करून देत आहे आणि गरीब माणूस मात्र रोजीरोटीसाठी संघर्ष करत आहे. भाजपा सरकार फक्त श्रीमंतासाठी काम करत आहे.
प्राथमिक आरोग्याच्या मुद्द्यावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड यांनी हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील घटना विषद केली. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना रुग्णालयात बेड नसल्याने ऐन थंडीच्या दिवसात जमिनीवर झोपवण्यात आले. सरकारी रुग्णालयातील ७२ टक्के बेड्स हे शहरातील रुग्णालयात आहेत याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील वाटपाचा मोठा हिस्सा राज्यांना जातो तरीही महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यांनी आरोग्यावर ५% पेक्षा कमी खर्च केला, जे सर्वात कमी राज्यांपैकी एक आहे. आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ मध्ये केलेल्या शिफारशींपेक्षा सातत्याने कमी होत आहे, त्यात सुधारणा करण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
00000