भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांमधील दुरावा आता वाढू लागला आहे. एकीकडे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने आधीच मंजूर केलेला बँडविड्थ ट्रान्झिट करार रद्द केला. दुसरीकडे, बटाटे आणि कांद्याच्या आयातीसाठी हा देश भारताव्यतिरिक्त इतर स्त्रोतांचा विचार करत आहे. भारत आणि बांगलादेशमधील परिस्थिती अशीच बिघडत राहिली आणि भारताने बांगलादेशला काही वस्तूंची निर्यात थांबवली, तर बांगलादेशमधील लोकांच्या ताटातून अनेक गोष्टी गायब होतील.
दोन्ही देशांमधील आयात-निर्यात थांबल्याचा सर्वाधिक परिणाम गव्हावर होईल. वास्तविक, बांगलादेश दर वर्षी भारतातून भरपूर गहू आयात करतो. 2021-22 मध्ये भारतातून बांगलादेशला निर्यात झालेल्या गव्हाचे मूल्य 119.16 कोटी डॉलर इतके होते. त्याच वेळी 2020-21 मध्ये गहू निर्यातीचा हा आकडा 310.3 दशलक्ष डॉलर्स होता. म्हणजे भारताने बांगलादेशला गव्हाचा पुरवठा बंद केला तर तिथल्या लोकांच्या ताटातून भाकरी नाहीशी होईल. गव्हाव्यतिरिक्त तांदळासाठीही बांगलादेशमधील लोक तळमळतील. भारतातून बांगलादेशमध्ये निर्यात होणारी तिसरी सर्वात मोठी वस्तू म्हणजे तांदूळ. 2021-22 मध्ये एकूण 613.9 दशलक्ष डॉलर किमतीचा तांदूळ बांगलादेशला निर्यात करण्यात आला. म्हणजे दोन्ही देशांमधील परिस्थिती बिघडल्याचा परिणाम त्या देशातील लोकांच्या ताटातील भातावरही होईल.
भारत गहू आणि तांदळाप्रमाणेच बांगलादेशलाही साखर पुरवतो. 2021-22 मध्ये भारतातून बांगलादेशला सुमारे 565.9 दशलक्ष डॉलर्सची साखर निर्यात केली होती. त्याच वेळी, 2020-21 मध्ये हा आकडा 74.7 दशलक्ष डॉलर्स होता. या आकडेवारीवरून भारताने बांगलादेशला साखर पाठवणे बंद केल्यास तेथील लोकांना मिठाई मिळणार नाही, हे स्पष्ट होते. याशिवाय भारतातून बांगलादेशमध्ये फळे, भाज्या, मसाले, कापूस, तेल पेंड आणि प्रक्रिया केलेल्या इतर वस्तूंची निर्यात केली जाते.
भारतापासून अंतर वाढत असल्यामुळे बांगलादेशने पाकिस्तानशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः व्यावसायिक दृष्टिकोनातून बांगलादेश आणि पाकिस्तान एकत्र येत असल्याचे दिसते. याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. वास्तविक, बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात कराची बंदरातून चितगाव बंदरात साखरेची खेप पाठवली जाईल. पाकिस्तानच्या स्थानिक मीडियानुसार, अनेक वर्षांनी हा करार झाला आहे. आत्तापर्यंत बांगलादेश आपली साखरेची गरज भारतातून पूर्ण करत असे; परंतु भारताने साखर निर्यातीवर बंदी घातल्याने त्याने पाकिस्तानमधून आयात करण्याचा पर्याय निवडला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या परवानगीनंतर देशातील साखर उद्योगाने सुमारे सहा लाख टन साखर निर्यात करण्याचा करार केला आहे. या करारानुसार साखरेचा मोठा हिस्सा बांगलादेशला निर्यात केला जाईल. बांगलादेशला साखरेचा पुरवठा व्हावा आणि देशांतर्गत साखर उद्योगाला नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानकडून साखर खरेदी करण्यापूर्वी बांगलादेश भारतातून साखर आयात करत असे. ‘ट्रेडिंग इकॉनॉमिक टाईम्स’च्या अहवालानुसार बांगलादेशने भारतातून 353.46 दशलक्ष डॉलर किमतीची साखर आयात केली. पाकिस्तानच्या एकूण सहा लाख टन साखर निर्यात योजनेपैकी 70 हजार टन साखर मध्य आशियाई देशांमध्ये पाठवली जाईल. थायलंडने 50 हजार टन साखर खरेदी केली आहे. याशिवाय आखाती देश, अरब देश आणि अनेक आफ्रिकन देशांनीही पाकिस्तानकडून साखर खरेदी करण्याचे करार केले आहेत. हा निर्यात करार या देशाच्या साखर उद्योगासाठी सकारात्मक संकेत असल्याचे पाकिस्तानी साखर व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी माजिद मलिक यांनी सांगितले होते. या करारामुळे पाकिस्तानी उद्योगांना नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळेलच; शिवाय परकीय चलनाचा साठाही वाढेल. याशिवाय बांगलादेश-पाकिस्तान व्यापार संबंधांमध्ये साखर आयात कराराकडे एक नवीन पुढाकार म्हणून पाहिले जात आहे. यामुळे प्रादेशिक बाजारपेठेत पाकिस्तानचे स्थान मजबूत होईल, मात्र यामुळे भारताचे नुकसान होऊ शकते.