मुंबई  :  ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, अशा व्यक्तींविषयी आणि इतर मान्यवर व्यक्तींच्या अज्ञात बाबींविषयी धैर्याने पुस्तक लिहिणे आणि ते छापल्याबद्दल “सत्तरीतील सेल्फी” या पुस्तकाचे लेखक  चंद्रकांत बर्वे आणि प्रकाशक अलका भुजबळ या दोघांचेही कौतुक केले पाहिजे,असे गौरोद्गार मुलाखतकार तथा लेखक सुधीर गाडगीळ यांनी काढले .

गाडगीळ यांच्या हस्ते उरळी कांचन येथील निसर्गोपचार  आश्रमात या पुस्तकाचे प्रकाशन झाले,त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,

“सत्तरीतील सेल्फी” हे पुस्तक मी वाचले आणि फार चकितच झालो कारण मला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकामुळे कळल्या.

निसर्गोपचार आश्रमाचे प्रमुख डॉ. अभिषेक देविकर यावेळी बोलताना म्हणाले की, पुस्तक हाती घेताच या पुस्तकाच्या नावामुळे पुस्तकाविषयी मला असे कुतूहल वाटले की, सत्तरच्या दशकाविषयी हे पुस्तक  असेल. पण ते तसे नसून लेखक चंद्रकांत बर्वे यांच्या सत्तर वर्षांच्या आयुष्यातील ३५ वर्षांच्या आकाशवाणी, दूरदर्शनमध्ये भेटलेल्या व्यक्तींविषयी या पुस्तकात  लिहिले आहे. ते खरोखरच वाचनीय झाले आहे.

हे पुस्तक लिहिल्याबद्दल आणि ते प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी लेखक व प्रकाशकांचे अभिनंदन केले.

पुस्तकाची समीक्षा करताना प्राध्यापिका आशी नाईक यांनीही पुस्तकाचे यथायोग्य मूल्यमापन केले. एखादी व्यक्ती एखाद्या घटनेकडे कशी पाहते हे मात्र त्या व्यक्तीच्या “स्व” वर बरेच अवलंबून असते. चंद्रकांत बर्वे कसे आहेत तर उत्तम निरीक्षण कौशल्य असलेले, चिकित्सक वृत्ती असलेले आणि अगदी बिनधास्त, बेधडकपणे त्यांचे विचार मांडणारे आहेत, असेही त्या म्हणाल्या.

पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त करतांना लेखक  चंद्रकांत बर्वे म्हणाले, महात्मा गांधी यांनी कायम सत्याची कास धरली होती म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या निसर्गोपार आश्रमात हे पुस्तक प्रकाशित होत आहे,याचा विशेष आनंद होतो आहे.या पुस्तकातील प्रत्येक शब्द सत्यच आहे. सत्य हे कल्पिताहून श्रेष्ठ असते. मी हुशार नसल्याने नेहमी खरंच बोलतो,असे सांगून त्यांनी

आकाशवाणी, दूरदर्शन मध्ये ३५ वर्षे नोकरी करीत असताना विविध क्षेत्रातील शेकडो व्यक्ती भेटल्या. पण पुस्तकातील व्यक्तींविषयीच लिहावेसे वाटले कारण त्यांच्यात इतरांपेक्षा काही तरी वेगळे होते,म्हणून त्यांच्या विषयी लिहिले,असे सांगितले.  प्रकाशिका अलका भुजबळ यांनीही आपले विचार मांडले. न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *