नवी मुंबई : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDS) व्दारे ‘नमस्ते’ योजनेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाईमित्रांसाठी महानगरपालिका क्षेत्रातील मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टॅंक यांची सुरक्षित साफसफाई या विषयाबाबत विशेष कार्यशाळा नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाली.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यधुनिक यंत्रणा वापरुन शहर स्वच्छतेवर भर दिला जात असतानाच शहर स्वच्छतेसाठी झटणा-या स्वच्छतामित्र व सफाईमित्रांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.
याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या ‘नमस्ते’ योजनेंतर्गत सफाईमित्रांसाठी आयोजित करण्यात आलेली ही विशेष कार्यशाळा प्रातिनिधीक स्वरुपातील 50 हून अधिक सफाईमित्र यांच्या सहभागातून यशस्वीरित्या संपन्न झाली.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ यांच्या वतीने जेनरोबोटिक इनोव्हेशन यांच्या माध्यमातून ही कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये मलनि:स्सारण वाहिन्या व सेप्टिक टॅंक सुरक्षितरित्या सफाई करण्याची गरज विशद करण्यात आली तसेच त्याकरिता असलेल्या नियमांची व कायद्यांची माहिती देण्यात आली.
मॅनहोलची सफाई पध्दत पूर्णपणे बंद करुन मशीनहोल सफाईचा अंगिकार करण्याच्या कायद्याविषयी माहिती देताना नवी मुंबई महानगरपालिका कायदा होण्याच्या आधीपासूनच मशीनहोल सफाईला प्राधान्य देत असल्याबद्दल जेनरोबोटिकच्या प्रशिक्षकांनी प्रशंसा केली.
यावेळी सुरक्षा साधने व सुरक्षित यंत्रसामुग्री यांचीही सविस्तर माहिती प्रशिक्षकांनी दिली. सफाईमित्रांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती देत प्रशिक्षकांनी स्वच्छता उद्यमी योजनेंतर्गत सफाई मित्रांना कर्ज स्वरुपात वित्त पुरवठा केला जातो त्याची सविस्तर माहिती दिली. त्यासोबतच ‘नमस्ते’ आणि ‘दक्ष’ उपक्रमांतर्गत करण्यात येणा-या कामाची माहिती दिली.
अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकारी अभियंता श्री. दिपक सूर्यराव, कनिष्ठ अभियंता श्री. दिलीप बेनके व श्री. वैभव देशमुख यांनी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. मलनि:स्सारण व्यवस्थापनाप्रमाणेच हा स्वच्छ सर्वेक्षणाचा भाग असल्याने तसेच स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सध्या स्वच्छ शौचालय अभियान सुरू असल्याने यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागानेही महत्वाचा आयोजन सहभाग घेतला.