ठाणे, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी केंद्रशासनाने Good Goverence Week 2024 हा सप्ताह महापालिका स्तरावर राबविण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिनांक 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सदर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
केंद्रशासनाने ‘प्रशासन गाव की और’ अभियान राबविण्याचे निश्चित केले असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेने देखील याची पूर्वतयारी केली असून उद्या 19 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत कालावधीत दर दिवशी सकाळी 11 ते 1 या वेळेत नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्व शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी / समस्या अथवा सूचना महापालिकेकडे सादर करावयाच्या आहेत, या तक्रारींचे निराकरण महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्याने करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना उपरोक्त नमूद दिवशी उपस्थित राहता येणार नाही त्यांनी आपल्या तक्रारी tmcgovernance@thanecity.gov.in या ई-मेलवर अथवा 8657887101 या भ्रमणध्वनीवर व्हॉटसॲपच्या माध्यमातून पाठवाव्यात असेही आयुक्तांनी नमूद केले. या सप्ताहादरम्यान 19 डिसेंबर 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय/ राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा, जन्म मृत्यूविभाग, फायलेरिया विभाग, पशुवैद्यकीय विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, परवाना विभाग , मालमत्ता करवसुली आदी विभागांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे. तर 20 डिसेंबर 2024 रोजी शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारणविभाग, अग्निशमन विभाग, वृक्षप्राधिकरण व उद्यान विभाग, पर्यावरण विभाग, माहिती व तंत्रज्ञान या विभागांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे.21 डिसेंबर 2024 रोजी समाज विकास विभाग, दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजना, महिला व बालविकास कल्याणकारी योजना आदी विभागांच्या तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. 22 डिसेंबर 2024 रोजी आस्थापना विषयक बाबी तर 23 डिसेंबर 2024 रोजी Good Goverence या विषयावर शासन सेवेत कार्यरत अथवा सेवेतून निवृत्त झालेल्या तज्ज्ञ अधिकारी यांचे ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी यांचेकरिता विशेष व्याख्यान आयोजित केले जाणार आहे.