मुंबई : मागील अडीच तीन वर्षांपासून आपण सतत पाहत आहोत की, भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याचा निंदनीय प्रकार सुरू आहे.आता हा अपमान सहनशीलतेच्या पुढे गेला आहे. आता तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कहरच केला. त्यांनी अतिशय उर्मटपणाने आता आंबेडकर आंबेडकर फॅशन झाली आहे. त्यापेक्षा देवाचे नाव घेतले असते, तर पुण्य लाभले असते, असे विधान केले आहे. आता यावर भाजपचा घटक पक्ष असलेले नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू कोणती भूमिका घेणार? केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले राजीनामा देणार का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी केला. त्यावेळी आम्ही मोर्चेही काढले. आता महाराष्ट्र हा गांडूळांचा प्रदेश आहे, असे त्यांना वाटत आहे. भाजपचा गुरखा फाटला आहे. मूंह मे राम आणि बगल में छुरी हे भाजपचं हिंदुत्व आहे. आमचे मिंदे भाजपसोबत गेले. त्यासोबत अजित पवार गेले. हे दोघे आंबेडकरांचा अपमान सहन करणार का?, असा सवाल त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे क्लिअर केले पाहिजे की, हे तुम्ही अमित शहा यांच्या कडून बोलावून घेतले आहे का ? अमित शहांवर भाजप कारवाई करणार आहे की नाही, हे सांगावे. ज्यांनी देशाला संविधान दिले. त्या महामानव डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहा असे बोलू कसे शकतात. पंतप्रधान मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रात महायुतीला राक्षसी बहुमत मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कसे ही वागवा. आंबेडकर केवळ एका पक्षाचे नव्हते. माझे आजोबा आणि आंबेडकरांचे नाते होते. भाजप बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसायला निघाले आहेत. मनुविकृतीमुळे आंबेडकर त्रासले होते. आता भाजपची मनुविकृती समोर आली आहे. माझ्या आजोबांनी आणि बाबासाहेब यांनी मनुविकृती विरुद्ध लढा दिला आहे. आता यावर भाजपची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. आम्ही या विरोधात आंदोलन करणार आहे, असे ठाकरे म्हणाले.
०००००