पनवेल : शिक्षण हक्क कायदा (आरटीई)अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन शाळा नोंदणी बुधवारपासून सुरू झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या वेळी अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाहीत. मुख्याध्यापकांकडून कागदपत्रे तपासून प्रवेश निश्चित केला जातील.
ऑनलाइन नोंदणीत शाळांची संख्या वाढल्यास प्रवेशासाठी जागांची वाढ होणार असल्याची शक्यता आहे. ऑनलाइन आरटीई प्रवेश प्रक्रियेत गेल्या दोन वर्षांत विविध अडचणी पालकांना भेडसावत आहेत. ऑनलाइन अर्जासोबत मूळ कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक होते. त्यामुळे सायबर कॅफेमध्ये पालकांना पैसे देऊन अर्ज भरावा लागत होता. त्यामुळे काही पालक आरटीई प्रवेशासाठी पात्र असूनही त्यांचे अर्ज भरत नसल्याचे निदर्शनास आले. आरटीईअंतर्गत पनवेलमध्ये ११० शाळांमधून २,२०० विद्यार्थीसंख्या निश्चित आहे. २,२०० जागांसाठी पनवेलमधून १९ हजार अर्ज आले होते. त्यामुळे पनवेल विभागातील शाळांमधून आरटीई प्रवेश पूर्ण क्षमतेने भरले जात आहेत. यंदा अधिक शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केल्यास आरटीई प्रवेश क्षमता वाढण्याची शक्यता आहे. सर्व पात्र शाळांना ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
मोफत असूनही शुल्क भरण्याचा भुर्दंड
शिक्षण प्रशासन केवळ प्रवेश प्रक्रिया राबवते; मात्र शाळेत रुजू झाल्यानंतर पालक व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मोफत प्रवेश असूनही अनेक पालकांना शाळेचे विविध प्रकारचे शुल्क भरावे लागत आहे. यावर शिक्षण विभागाने निर्बंध आणण्याची मागणी होत आहे.
प्रक्रिया सुलभ करा!
यंदा आरटीईची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली होती. प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन पेचात अडकल्याने अनेकांना प्रवेश निश्चित होऊनही शाळांमध्ये प्रवेश घेता आले नाहीत. नव्या सत्रात प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *