सिंधुदुर्ग : आचरे गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरातले चौघडे निनादू लागले. तोफा धडाडल्या. गावकऱ्यांना गाव सोडण्याचा इशारा झाला बारा पाच मानकऱ्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार,पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला. मंदिराच्या पुढल्या दरवाजालाही कुलूप ठोकले.नौबत दणदणत होती आणि आचरे गावचे ग्रामस्थ लगेचच आपापली घरंदारं बंद करून गुरंढोरं,कोंबडया,कुत्री, मांजरी आदी,आपल्या सामानासकट गावाच्या वेशीबाहेर नियोजित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करू लागले. काहीनी होडीतून, तर काहींनी टेम्पो, मोटार आदी वाहनांच्या सहाय्याने वेशी बाहेरची वाट धरली.
आणि अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण आचरा गाव निर्मनुष्य झालं शांत झालं. सर्व ग्रामस्थानी श्री देव रामेश्वरावर आपापल्या घरादारांची जबाबदारी सोपवत गावच्या वेशी बाहेर रानावनात आपले संसार थाटले आहेत.
गेले दोन – तीन दिवस सिंधुदुर्गात चांगलीच थंडी आहे.अशा वातावरणात गावकऱ्यांना तीन दिवस आणि तीन रात्री काढायच्या आहेत. वेशी बाहेर उभारलेल्या झोपड्यांमध्ये, राहुट्यामध्ये नुसताच गजबजाट असणार आहे. एरवी आपआपल्या घरात मोबाईलमुळे हरवलेले संवाद आता पाच दिवसांसाठी का होईनात पुन्हा जुळणार आहेत.
वेशी बाहेर सर्व गाव एकत्र आल्याने चांगला संवाद होत आहे. नाचगाणी, खेळ, फुगड्या,भजने यामुळे वातावरण बदलले आहे.गावातल्या वाडी वास्त्यासंमधील गावकऱ्यांनी परिसरातल्या मोकळ्या माळरानावर राहूट्या उभ्या केल्या आहेत. शेकडो वर्षाची ही आगळी -वेगळी प्रथा जपण्याचा सर्वच ग्रामस्थ प्रयत्न करताना दिसतात.
या गावपळणीचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर चाकरमानी सुद्धा सहभागी झाले आहेत, हे विशेष होय. गाव पाळण म्हणजे नेमके काय..? यामागे धार्मिक पेक्षा वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक हे नव्या पिढी समोर ठेवण्याचा प्रयत्न गावातले सुशिक्षित सुजाण लोक करतात. दर पाच वर्षांनी तीन दिवस आणि तीन रात्र गाव निर्मनुष्य रहात असल्याने गाव स्वच्छ व निरोगी रहाण्यास मदत होते. ध्वनी प्रदूषण नाही.एकूणच या प्रथेमुळे गाव निर्मल आणि स्वच्छ रहातो आणि म्हणूनच दर पाच वर्षानी येणारी गाव पळण प्रथा पुढेही अशीच सुरु राहील यासाठीचे प्रयत्न प्रत्येक वेळी केले जातात.