ठाणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत कृषी दिन व शेतकरी सन्मान समारंभाचे आयोजन १७ डिसेंबर २०२४ रोजी, बी.जे. हायस्कूल, कोर्ट नाका, ठाणे येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. याप्रसंगी कृषि विभागातील घडीपत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृषी क्षेत्र विकसीत करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध योजना राबविण्यात येत असून गट शेती तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोहन घुगे यांनी केले.
याप्रसंगी, तंत्रज्ञानाच्या वापराने शेती विकसीत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असताना ठाणे जिल्ह्यात भातशेती मोठ्याप्रमाणात करत असून शेतकऱ्यांनी विविध पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. फुल, फळ तसेच बाजारात ज्या पिकांची मागणी असते त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. यासाठी आवश्यक त्या योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील असेल, असे आश्वासन ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.कुक्कुटपालन सोबत शेती करणे आवश्यक असून विविध जोड व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे तसेच तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे मार्गदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजिंक्य पवार यांनी केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. रामेश्वर पाचे, झिनिक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष श्री. खलील शेख, कृषी तज्ञ श्री.उत्तम सहाने, कृषी तज्ञ डॉ. नामदेव म्हसकर, जिल्हा कृषी अधिकारी श्रीम.सायली आडसुळ, कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते प्रस्तावना करताना कृषी विकास अधिकारी श्री मुनिर बाचोटीकर यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजना अंतर्गत शेतकरी/शेतमजूर/बचत गट/ग्रामसंघ यांना भाजीपाला विक्रीसाठी साहित्य तसेच ई -कार्ट पुरविणे या योजना राबवित असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी सन्मान सोहळा करण्यात आलेला आहे. वैयक्तिक प्रगतशील शेतकरी १० तर गट शेती ९ गटांचा सन्मान करण्यात येत असल्याचे यावेळी कृषी तज्ञ डॉ. नामदेव म्हसकर यांनी नैसर्गिक शेती तर कृषी तज्ञ उत्तम सहाने यांनी रब्बी हंगामातील भाजीपाला लागवड व मधुमक्षिका पालन या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम स्थळी शेतकऱ्यांना उपयुक्ती शेती साहित्य बाबत तसेच विविध कीटकनाशके, स्प्रेयर्स यांचे स्टॉल लावण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच बचत गट यांच्याकडील तांदूळ, पौष्टिक तृणधान्य पदार्थ व भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. तरुलता धानके यांनी केले.