महिनाभरात पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे काम हाती घेतले असून स्मारकाची दोन टप्प्यामध्ये उभारणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील ९९ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महिन्याभरात,जानेवारी २०२५ मध्ये स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करून स्मारक सर्वसामान्यांसाठी खुले करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
दादर येथील महापौर निवाससथानी बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात महापौर निवासाचे वारसा जतन आणि संवर्धन केले जात आहे. यात इमारतीचे बांधकाम, स्थापत्य, विद्याुत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी यासह अन्य कामे केली जाणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे संग्रहालय बांधण्यात येणार आहे. त्यानुसार येथे ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय उभारण्यात येत आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्याच्या कामाला २०२१ मध्ये सुरुवात करण्यात आली असून हा टप्पा आतापर्यंत पूर्ण होऊन सर्वसामान्यांसाठी खुला होणे अपेक्षित होते. मात्र, या टप्प्याच्या पूर्णत्वास काहीसा विलंब झाला आहे. मात्र, आता हा टप्पा महिन्याभरात सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. सुमारेे २५० कोटी रुपये खर्चाच्या या पहिल्या टप्प्याचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारी २०२५ मध्ये लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दुसऱ्या टप्प्यात ‘लेझर शो’चा समावेश
दुसऱ्या टप्प्यासाठी मात्र नागरिकांना काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय उभारण्यात येत आहे. या म्युझियमच्या माध्यमातून येथे येणाऱ्यांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याचा, त्यांच्या प्रतिमेला स्पर्श करत असल्याचा अनुभव मिळणार आहे. अत्याधुनिक अशा डिजिटल भिंती, लेझर शो, दृकश्राव्य माध्यम, व्हर्च्युअल रियालिटी अशा तंत्रज्ञानाचा वापर करून हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. डिजिटल भिंतीवरील एखाद्या माहितीवर बोट क्लिक केल्याबरोबर दृकश्राव्य रूपात माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यांना एक वेगळीच अनुभूती मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांना काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *