केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हे प्रकल्पाला गती देणार – खासदार नरेश म्हस्के

अनिल ठाणेकर
नवी दिल्ली, मुंबई, डोंबिवली, ठाणे, भाईंदर शहरांना जोडणाऱ्या प्रवासी जल वाहतुकीसाठी ९६.१२ कोटींचा अंदाजे खर्च येणार असून केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हे या प्रकल्पाला गती देणार असल्याची माहिती ठाणे लोकसभेचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांना दिली आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. मुंबई, डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जल वाहतुकीद्वारे जोडण्यासाठी नरेश म्हस्के यांनी यावेळी निवेदन दिले. खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत सोमवारी, १६ डिसेंबर रोजी संसदेत नियम ३७७ अन्वये जल वाहतुकीचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी क्षेत्रांना (एमएमआर) अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे जोडण्याची योजना आखली आहे. ही प्रणाली सुरुवातीला भाईंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली येथे चार जेटी बांधून मीरा-भाईंदर, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवली यांना जोडेल. प्रवासी जलवाहतूक पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी सुरुवातीला वसई खाडी – उल्हास नदीवर चालविली जाणार आहे. या प्रकल्पामुळे MMR मधील नागरिकांना सुलभ प्रवासाचा लाभ मिळून वेळेचीही बचत होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
९६.१२ कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चात चार जेटींचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे, ज्याचा खर्च सागरमाला योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारे समान प्रमाणात करतील. लोकांमध्ये अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकप्रिय करण्याची गरज आहे परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी संथगतीने होत आहे. हि सुविधा तयार झाल्यानंतर, राज्य सरकारला प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी ऑपरेटर याची आवश्यकता लागेल. मांडवा दरम्यान रो-पॅक्स सेवा तसेच त्याच मार्गावरील पारंपारिक फेरी सेवा लोकप्रिय आहेत आणि लोकांना आकर्षित करत आहेत त्याच धर्तीवर येथेही या सुविधा सुरू केल्यास त्या लोकप्रिय होतील, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. MMR मधील वाढती लोकसंख्या आणि निवासी क्षेत्र लक्षात घेता अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय जलमार्ग ५३ वर आणखी जेटी बांधण्याची योजना असली तरी, त्या नंतर बांधल्या जातील आणि वसई, कल्याण, पारसिक, नागलाबंदर, अंजूर दिवे आणि घोडबंदर/गायमुख सारख्या भागात सेवा देतील. गायमुख, घोडबंदर येथे एक जेट्टी आधीपासूनच कार्यरत आहे आणि फ्लोट चालविण्यासाठी वापरली जात असलायची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. मुंबईतील अंतर्देशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी हे MMR मध्ये कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि ते उपलब्धता, परवडणारीता आणि सुविधा यासारख्या विविध घटकांवर अवलंबून आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री श्री. सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *