रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या ठाणे शहर युवक आघाडीचे अध्यक्ष विनोद भालेराव यांची मागणी
ठाणे : राजधानी दिल्लीत सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट)युवक आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष विनोद भालेराव यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी काल संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विनोद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विनोद भालेराव यांनी शिष्टमंडळासह ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे अमित शहा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. विनोद भालेराव यांच्यासमवेत कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे, प्रसिद्धी प्रमुख तात्याराव झेंडे, कार्याध्यक्ष विशाल ढेगळे महासचिव अशोक कांबळे, सचिव मंगेश सादरे, महिला आघाडी उपाध्यक्षा विमल सातपुते, उपाध्यक्षा सुमन इंगळे, दिवा विभाग अध्यक्ष दिनेश पाटील, मुंब्रा विभाग अध्यक्ष हनुमंत लांडगे, विभागीय अध्यक्ष संजय गांगुर्डे, युवराज वावळ सुभाष नगर विभाग अध्यक्ष बबन वाघमारे, उपाध्यक्ष बबन केदार, सदस्य सुरेश केदारे आदी उपस्थित होते.