ठाणे : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात ठरवून दिलेले मालमत्ता कराचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षाच्या मार्च महिन्याअखेरपर्यंत शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही मालमत्ता कर संकलन केंद्र सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
ठाणे महापालिकेच्या २०२४-२५ या ‌वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला ८३५ कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यापैकी ५३५ कोटी रुपयांची कर वसुली आतापर्यंत झाली आहे. मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जात असून करोना काळातही याच करवसुलीमुळे महापालिकेला काहीसा आर्थिक दिलासा मिळाला होता. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवर भर देण्यास सुरूवात केली असून त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता पुढील वर्षाच्या मार्च महिन्याअखेरपर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही मालमत्ता कर संकलन केंद्र सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली व्हावी आणि सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालत्ता कर भरण्याची सुविधा मिळावी या उद्देशातून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग, उप प्रभाग स्तरावरील सर्व कर संकलन केंद्र आणि प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालये तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील मुख्य करवसुली कार्यालय, नागरी सुविधा केंद्रातील कर संकलन केंद्र ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शनिवार सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत तसेच १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सर्व शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० आणि तसेच सर्व रविवार सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत कर संकलनासाठी कार्यान्वित राहणार आहेत. १४ मार्च रोजी धुलीवंदन असल्याने या दिवशी कार्यालये बंद राहणार आहेत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
करदात्यांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेची सर्व कर संकलन केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नाही. अशांनी मालमत्ता करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *