डोंबिवली : येथील पूर्वेतील कस्तुरी प्लाझा संकुलाजवळील श्री माऊली प्रसन्न सोसायटीच्या तळमजल्याला असलेल्या वाहनांच्या सुट्टे भागाच्या गोदामाला गुरुवारी सकाळी आग लागली.गोदामात टायर, वाहन वंगण असे ज्वलनशील घटक असल्याने गोदाम आगीत खाक झाले. पालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग शमवली.
मानपाडा रस्त्यावर टाटा पाॅवर लाईनजवळ श्री माऊली प्रसन्न सोसायटीच्या तळ मजल्याला सद्गुरू कृपा वाहनांचे सुट्टे भाग विक्री दुकान आणि त्याच्या पाठीमागील भागात सुट्टे भागांचे गोदाम आहे. गुरुवारी सकाळी गोदामातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. सोसायटीतील रहिवासी, आजुबाजुचे रहिवासी आग लागल्याचे समजताच घाबरले. आगीच झळ इतर भागाला बसू नये म्हणून गोदामा जवळच्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील लाकडी, ज्वलनशील वस्तू दुकानाबाहेर काढल्या.
पालिका अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. धुराने भरलेल्या बंद गोदामात दरवाजावाटे शिरणे शक्य नसल्याने जवानांनी गोदामाच्या खिडक्या उचकटून मग पाण्याचे फवारे मारण्यास सुरूवात केली. गोदामात टायर, वाहनांचे वंगण असल्याने आगीने आत रौद्ररुप धारण केले होते.
रामनगर पोलिसांनी या इमारतीमधील रहिवाशांना पहिले घराबाहेर काढले. अग्निशमन जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कस्तुरील प्लाझा संकुलाजवळील टाटा पाॅवर लाईनखालील वाहन दुरुस्तीच्या कार्यशाळा पोलीस, वाहतूक पोलीस, पालिकेने बंद कराव्यात म्हणून या भागातील रहिवाशांनी मागील अनेक वर्षापासून प्रशासनाकडे तक्रारी करत आहेत. त्याची दखल घेतली जात नाही, असे रहिवाशांनी सांगितले. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी या कार्यशाळांचे रस्त्यावरील काम, त्यांचे निवारे यापूर्वी तोडले होते. वाहतूक विभाग, पोलीस यांंनी संयुक्तपणे कारवाई करून निवासी वस्तीमधील या वाहन दुरुस्ती कार्यशाळा बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे रहिवाशांनी सांगितले. गोदामाला लागलेली आग भडकली असती तर संपूर्ण नागरी वस्तीला त्याची झळ बसली असती असे रहिवाशांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *