आपल्या विस्तारवादी धोरणाचा भाग म्हणून शेजाऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करून त्यावर दावा सांगण्याची चीनची जुनी सवय आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जेव्हा चीनने गलवान खोऱ्यातून माघार घेण्याचा करार केला आणि सैन्य माघारी घेतले, तेव्हा याच स्तंभात आम्ही ड्रॅगनची ही तिरकी चाल असून, त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये, असा इशारा दिला होता. आता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनच्या दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत असताना चीनने भूतानच्या सीमेवर नवीन २२ गावे वसवली असल्याचे उघड झाले आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरही चीनने यापूर्वी अशी आगळीक केली होतीच; परंतु आपण त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही. भारताच्या शेजारी असलेला एखादा अपवाद वगळता एकही देश सध्या भारताचा सच्चा मित्र म्हणावा असा राहिलेला नाही. पंडित नेहरू यांच्या परराष्ट्र धोरणावर सातत्याने टीका करणाऱ्यांच्या काळात हे घडावे, यासारखे दुर्दैव नाही. अडचणीच्या काळात हजारो किलोमीटरवरचा मित्र मदतीला येईल, की एखादा शेजारी मदतीला येईल, याचा विचार करायला हवा. इस्त्रायलचे उदाहरण देऊन आपपण तशी तुलना करणेही गैर आहे. इस्त्रायल इस्लामी राष्ट्रांनी वेढला असला, तरी त्यांच्यात एकाचीही क्षमता चीनसारखी नाही. याउलट भारताला चीनचा शेजार असून आता तैवान आणि श्रीलंकेसारखा एखाद-दुसरा देश वगळता बहुतांश देश आता चीनच्या कच्छपि लागले आहेत. एकीकडे चीन भारताशी सीमा विवाद (इंडो-चायना बॉर्डर डिस्प्यूट) सोडवण्याबाबत बोलत आहे, तर दुसरीकडे डोकलामच्या आसपासच्या गावांचा बंदोबस्त करत आहे. त्याच्या या सगळ्या युक्त्या सॅटेलाइट फोटोंमधून समोर येऊ लागल्या आहेत. शेजारी देश भूतान भारताला आपला खास मित्र मानत असला तरी त्याच्या शेजारी बसलेल्या चीनची त्याला जास्त भीती वाटते. भूतानच्या या भीतीने आता डोकलाम ट्राय जंक्शनजवळ भारताची चिंता वाढली आहे. भूतान गेल्या अनेक वर्षांपासून या भागात चीनच्या वसाहती उभारण्यास सातत्याने विरोध करीत असला, तरी आता सॅटेलाइट प्रतिमा वेगळे चित्र उघड करत आहेत. भारत-चीन-भूतानच्या ट्राय जंक्शनवर शी जिनपिंग यांचे सैन्य जे काही करत आहे, त्यामुळे सर्वांचेच कान टवकारले आहेत. डोकलामजवळील परिसरात चीनने आठ नवीन गावे वसवल्याचे उपग्रह प्रतिमामधून उघड झाले आहे. डोकलाम हे तेच क्षेत्र आहे, जिथे २०१७ मध्ये भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला होता. एकीकडे शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये झोपाळ्यावर बसून झोके घेत असताना दुसरीकडे डोकलाम सीमेवर चीनी सैन्य घुसखोरी करीत होते. त्यामुळे जवळपास ७३ दिवस दोन्ही सैन्याच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्या वेळी हे प्रकरण मिटले होते; पण तेव्हापासून चीन या भागात आपला दावा मजबूत करण्यासाठी अशा पद्धतीने गावे वसवत आहे.गेल्या आठ वर्षांत चीनने भूतानचा भाग असलेल्या या भागातील किमान २२ गावे वसवली आहेत. चीनसोबत गलवान खोऱ्यातील वाद सोडवल्यानंतर सर्व काही पूर्वीप्रमाणेच सामान्य झाले आहे, अशा समजात आपण राहत असू, तर त्यासारखी मोठी चूक नाही. या वेळीही ड्रॅगन आपल्या कृतीपासून परावृत्त झालेला नाही. चीन भूतानच्या भूमीवर खूप काही करत आहे; पण भूतानने यावर मौन पाळले आहे. गेल्या काही वर्षांपासून भूतानच्या अधिकाऱ्यांनी भूतानच्या हद्दीत चीनी वसाहतींचे अस्तित्व नाकारले आहे. भूतानचे माजी पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी २०२३ मध्ये बेल्जियमच्या एका वृत्तपत्राला भूतानच्या हद्दीत चीनी लोकांचे अस्तित्व असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. चीनने भूतानच्या भूमीवर २२ हून अधिक गावे वसवली आहेत. गेल्या आठ वर्षांत भारतीय सीमेभोवती हे बांधकाम झाले आहे. यामध्ये २०२० पासून चीनने डोकलामजवळील आठ गावे वसवली आहेत. चीनमधील या बांधकामाची माहिती सॅटेलाइट फोटोंवरून मिळाली आहे. चीनच्या या कृतीमुळे भारतासाठी चिंता निर्माण झाली आहे. कारण डोकलाम हे सामरिक दृष्टिकोनातून भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. चीनच्या या बांधकामामुळे भारताचा ‘चिकन नेक’ म्हटल्या जाणाऱ्या ‘सिलीगुडी कॉरिडॉर’च्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर भूतान आणि भारत यांच्यातील संबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेबाबत भारताची चिंता वाढणार आहे, ज्याला ‘चिकन नेक’ म्हटले जाते. हा कॉरिडॉर भारताला ईशान्येकडील राज्यांशी जोडणारा अरुंद मार्ग आहे. सर्व गावे रस्त्याने जोडलेली आहेत. ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज’ चे संशोधन सहयोगी रॉबर्ट बार्नेट यांच्या अहवालानुसार, २०१६ पासून चीनने भूतानच्या भूमीवर २२ गावे आणि वसाहती बांधल्या आहेत. येथे सुमारे २,२८४ घरे आहेत आणि ७,००० लोक राहतात. अहवालानुसार, चीनने ८२५ चौरस किमी भूभागावर कब्जा केला आहे, जो भूतानच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन टक्क्यांहून अधिक आहे. चीनने या गावांमध्ये अधिकारी, सीमा पोलिस आणि लष्करी जवानही तैनात केले आहेत. सर्व गावे चीनी शहरांशी रस्त्यांनी जोडलेली आहेत. ‘बार्नेट’ने आपल्या अहवालात लिहिले आहे, की भूतानच्या पश्चिमेकडील भागात चीनचा उद्देश डोकलाम पठार आणि आसपासच्या प्रदेशांवर आपला कब्जा मजबूत करणे आहे. पश्चिम विभागातील आठ गावे उत्तरेकडून दक्षिणेकडे ३६ किलोमीटर लांबीच्या रेषेत बांधली आहेत. प्रत्येक गावातील सरासरी अंतर ५.३ किलोमीटर आहे. ही गावे १९१३ मध्ये तिबेटच्या तत्कालीन शासकाने भूतानला सोपवलेल्या भागात बांधलेली आहेत.
चीनने काही दिवस या भागात शांतता राखली आणि नंतर डोकलामच्या आसपास बांधकाम क्रियाकलाप वाढवले, जे आता उपग्रह प्रतिमांद्वारे उघड झाले आहे. एप्रिल-मे २०२० मध्ये सुरू झालेल्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या लडाख सेक्टरमधील लष्करी अडथळ्यामुळे भारत आणि चीनमधील संबंध सर्वकालीन खालच्या पातळीवर पोहोचले होते. या वर्षी २१ ऑक्टोबर रोजी दोन्ही बाजूंनी एक करार केला, ज्यामध्ये डेमचोक आणि डेपसांगमधील फ्रंटलाइन सुरक्षा दलांना मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या करारानंतर आता चीनच्या नव्या बांधकामाची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही, तर २०२० पासून ड्रॅगनने डोकलाम नावाच्या पठारी भागाजवळ सुमारे आठ गावे बांधली आहेत. चीनचे हे पाऊल भूतानसाठी जेवढे धोकादायक आहे, तेवढेच भारतासाठीही नकारात्मक आहे. डोकलामजवळील भूतानच्या पश्चिमेकडील प्रदेशातील आठ गावे धोरणात्मकदृष्ट्या चीनने दावा केलेल्या खोऱ्याकडे किंवा कड्यावर वसलेली आहेत आणि बरीचशी चीनी लष्करी चौक्या किंवा तळ जवळ आहेत. निरीक्षक आणि संशोधकांनी शोधलेल्या २२ गावांपैकी जिवू हे सर्वात मोठे गाव आहे. हे पारंपारिक भूतानच्या गवताळ प्रदेशावर बांधले गेले आहे, ज्याला त्सेथांगखा म्हणूनही ओळखले जाते आणि ते पश्चिम भागात स्थित आहे. देपसांग बल्ज, गोगरा-हॉट स्प्रिंग्स, गलवान, पँगोंग त्सो आणि डेमचोकचे दक्षिणेकडील क्षेत्र आणि उत्तरेकडील किनारा हे पाच वादग्रस्त मुद्दे आहेत. एप्रिल २०२० पूर्वीची परिस्थिती येथे पूर्ववत झाली, तर त्याची तुलना पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल विजयाशी केली जाऊ शकते. चीनने इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्या भूमिकेपासून माघार घेतली, तर त्याचे परिणाम दिसून येतील हे निश्चित आहे. याचा अर्थ शी जिनपिंग आणि त्यांच्या निष्ठावंत सैनिकांच्या गटासाठी ही गोष्ट मोठी लाजिरवाणी ठरेल. त्यामुळे शी एकीकडे माघार घेत असताना दुसरीकडे चीन भारताच्या सीमेनजीक घुसखोरी करीत आहे. भारताच्या गलवान खोऱ्यातून चीन माघार घेत असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. दहा पावले पुढे येणे आणि दोन पावले मागे जाणे म्हणजे माघार नव्हे. चीनवर विश्वास ठेवणे धोकादायक असून चीनबाबत आपल्याला दूरगामी नीती अवलंबावी लागेल. चीनच्या १४ देशांशी सीमा असून सर्वच देशांशी त्याचा सीमावाद आहे. चीन जेव्हा काही जमीन बळकवतो, अतिक्रमण करतो, तेव्हा ते माघार घेण्यासाठी नसते, हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. भारतीय राजकारणी, परराष्ट्र मंत्रालय आणि आपल्या लष्कराने चीनचा पूर्वानुभव लक्षात घेऊन तशी धोरण आखली पाहिजेत.