माथेरान :मागील काही वर्षांपासून माथेरान मध्ये हृदयरोग, अस्थमा, कॅन्सर, अर्धांगवायू अशा आजारांचा सामना करत आजही अनेकांना या व्याधींवर औषधोपचार घेण्यासाठी आर्थिक बाबतीत संघर्ष करावा लागत आहे. प्रदूषण मुक्त अशी खासकरून माथेरानची ओळख जरी असली तरीसुद्धा अनेकजण या आजारांनी मृत्यू पावले आहेत. एक एक करून युवा पिढी संपत चालली आहे. त्यासाठी इथल्या मातीमध्ये काही दोष आहेत का याची तपासणी तज्ज्ञांच्या परीक्षणानुसार झाल्यास इथल्या स्थानिकांना दिलासा मिळू शकतो. एकीकडे विपुल असणारी वनसंपदा लोप पावत चालली आहे. वारा वादळ नसताना सुध्दा अनेकदा झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत.मजबूत आणि रुबाबदार दिसणारी वृक्षवल्ली अचानक उन्मळून कशी काय पडतात याचाही उलगडा होत नाही.यापूर्वी इथे बाहेरील पर्यटक शुद्ध हवा, आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असणाऱ्या याठिकाणी दहा ते पंधरा दिवस मुक्कामी राहून आजारी व्यक्ती उत्तम प्रकारे ठीक होत असत.परंतु सद्यस्थितीत पूर्वी इथे येणाऱ्या खर्चिक पर्यटकांची संख्या रोडावली आहे. यामागचे नेमके काय कारण असावे या विवंचनेत स्थानिक नागरिक दिसत असून इथल्या मातीत प्रदूषणाच्या बाबतीत काही दोष आढळून येतात का याचे परीक्षण तज्ज्ञांच्या मदतीने होणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे. पायी चालत चालत इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेणारा पर्यटक वर्ग दिसत नसून शक्यतो आपल्या हॉटेलमध्ये राहणे पसंत करत असल्याने आगामी काळात सर्वसामान्य लोकांना वेळप्रसंगी व्यवसाय कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन ते तीन दशकांपूर्वी येथील बंगल्यात निदान पंधरा दिवस राहण्यासाठी बंगल्यांचे मालक त्याचप्रमाणे आपल्या मित्रमंडळी आणि परिवारातील सदस्यांना घेऊन येत असत. मस्तपैकी पॉईंट्सची सैर अनेकदा पायी भटकंती करून इथल्या निसर्गरम्य वातावरणाशी एकरूप होत असत. काही वर्षांपासून ही खर्चिक मंडळी आता कुठेही दिसत नाहीत.माथेरानवर निस्सीम प्रेम असणाऱ्या बहुतेक बंगले मालकांनी आपले बंगले विकून मुंबईत वास्तव्यास आहेत. इथे पर्यटनास न येता बाहेर देशात भटकंती साठी जातात. यांनी इकडे पाठ का फिरवली आहे हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून स्थानिकांनी दरवर्षी वृक्षारोपण करून ही वृक्षवल्ली टिकविणे सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे.गर्द झाडी आणि याच झाडीमुळे गारवा हे इथले समीकरण आहे परंतु जर का ही जुनी झाडी दरवर्षी अतिवृष्टीमुळे उन्मळून पडल्यास आपोआपच इथला गारवा कमी होणार आहे.पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या भूमीपुत्रांनी आपले माथेरान कायमस्वरूपी स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात इथे कुणीही येणार नाही.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *