आमदार सुनील शिंदे यांची मागणी
केतन खेडेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिर्लॉक आंबेडकरवाडी येथील एका घरात नरबळी सारख्या अघोरी आणि घृणास्पद कृत्याच्या तयारीत असलेल्या ५ व्यक्तींना दि. १८ डिसेंबर, २०२४ रोजी अटक करण्यात आल्याबाबतच्या गंभीर विषयाकडे विधानपरिषद आमदार सुनिल शिंदे यांनी नियम २८९ द्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. पोलिसांनी आंबेडकरवाडी येथील एका राहत्या घरात टाकलेल्या छाप्यात सुमारे ४ बाय ४ लांब आणि ८ फुट खोलीचा खड्डा आढळून आला. तसेच अनिष्ट प्रथेचा वापर करून जादूटोणा करणारे साहित्य आढळून आले. तसेच नरबळीसाठी लागणारे धारदार कोयता व सूरी अशी हत्यारे आढळून आली आहेत. पोलिसांनी आरोपीकडे केलेल्या चौकशीत गृहदोष निवारण्यासाठी आणि मूलबाल होत नसल्याने अघोरी पूजा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका निष्पाप जीवाचा बळी वाचला आहे. अन्यथा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदोस येथे पैशाच्या पावसाच्या मोहापायी घडलेल्या नांदोस हत्याकांडाची पुनरावृत्ति होण्याची दाट शक्यता होती. महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट व अघोरी प्रकार जादूटोणा प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अशा प्रकारच्या अघोरी कृत्यात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची, तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारच्या निंदनीय घटना सातत्याने घडत असल्याने सदर प्रकरणी सभागृहात सखोल चर्चा होण्याच्या दृष्टीने सभागृहाचे दि. १९ डिसेंबर, २०२४ रोजी होणारे कामकाज स्थगित करण्यात यावे, अशी विनंती आमदार सुनील शिंदे यांनी सभापती महोदयांना केली. त्यावर विषयाचे गांभीर्य ओळखून सभापती निलम गोऱ्हे यांनी सदर घटनेत सामील असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिंदे यांना दिले.