ठाणे: भारतातील प्रमुख बंदरांमध्ये पूर्वी तीन लाख गोदी कामगार होते. आता वीस हजार कामगार राहिले आहेत. मुंबई बंदरात पूर्वी चाळीस हजार कामगार होते, आता फक्त तीन हजार गोदी कामगार राहिले आहेत. तरी देखील गोदीचे कामकाज चालू आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार कायम स्वरूपी कामगारांची भरती बंद असून, कंत्राटी कामगारांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. मुंबई बंदराची आर्थिक स्थिती आता बरी आहे, त्यामुळे अरबी समुद्रात पाणी असेपर्यंत गोदी कामगारांना पेन्शन मिळत राहील. असे स्पष्ट उद्गार ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी पत्रकार स्नेहसंमेलनात काढले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने १९ डिसेंबर २०२४ रोजी माझगाव येथील कामगार सदन कार्यालयामध्ये पत्रकारांसाठी स्नेहसंमेलन झाले. ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे सांगितले की, कामगार चळवळीसमोर आज अनेक आव्हाने असून, कामगार संघटनांना कठीण दिवस आले असून, कामगारांची संख्या कमी झाल्यामुळे संघटनांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. तरी देखील भारतातील बंदर व गोदी कामगारांच्या एकजुटीमुळे गोदी कामगारांचा वेतन करार चांगला झाला आहे. हे सर्व श्रेय गोदी कामगार एकजुटीला जाते.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी विद्याधर राणे, युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांनी युनियनच्या १०४ वर्षाच्या ऐतिहासिक कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. उपस्थित पत्रकारांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला.
००००