ठाणे : चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी पाककला आणि वेशभूषा स्पर्धा आज चेंदणी कोळीवाड्यात होणाऱ्या कोळी महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. शनिवार, २१ डिसेंबर रोजी चेंदणी बंदर जेटी येथे होणाऱ्या या महोत्सवाचे यावर्षी १९ वे वर्ष आहे.
या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जोडीने कोळी पद्धतीचे खाद्यपदार्थ, कोळी समाज लोकजीवन,व्यवसाय यांची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत. प्रारंभी संध्याकाळी ५ वाजता चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येईल. ही शोभायात्रा चेंदणी बंदरावर आल्यानंतर समाजातील श्री आनंद भारती समाजाचे माजी अध्यक्ष सुभाष मोरेकर आणि सुभाष देवराम कोळी, कमल सुभाष कोळी, दिनकर यशवंत कोळी, प्रमिला यशवंत कोळी या दाम्पत्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. या महोत्सवाचे औचित्य समाजात भरीव कामगिरी करणाऱ्या सूक्ष्म जीवशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवणारे दिलीप नाखवा, खो खो मध्ये विभागीय स्पर्धेत निवड झालेला शिवम तांडेल, राष्ट्रीय खो खोपटू हर्षित कोळी, नोटरीपदावर नियुक्ती झालेल्या ऍड अनुराधा टिल्लू, मलेशियातील ट्रायथलॉन स्पर्धेत आयर्नमॅन ठरलेले मिनेश आणि गुंजन कोळी या दाम्पत्यासह रवींद्र कोळी, एलएलएमची पदवी संपादन करणारी कृपाली कोळी, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाच्या अध्यक्षा विभता अभिनय कोळी, निवेदक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांना गौरविण्यात येणार आहे. कोळी महोत्सवात कोळी गाणी , नृत्ये आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या कार्यक्रमाकरता गौरवचिन्हे चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष चंद्रकांत नाखवा, हर्षला नाखवा, केली आहेत. हा कोळी महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेकांचे हातभार लागले असून ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कलामंचाचे विक्रांत कोळी यांनी केले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *