कल्याण : येथील पश्चिमेतील गोदरेज हिल भागात आजमेरा या उच्चभ्रूंच्या सोसायटीत बुधवारी रात्री घरात धूप अगरबत्ती लावण्यावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर तुफान राड्यात झाले. या प्रकरणात या सोसायटीतील रहिवासी असलेल्या मंंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून दहा जणांनी सोसायटीतील दोन मराठी कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या मारहाण प्रकरणी संबंधित मंत्रालयीन अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक करावी. त्यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, अशी कलमे खडकपाडा पोलिसांनी लावावीत, या मागणीसाठी सोसायटीतील रहिवाशांनी गुरुवारी रात्री सोसायटी आवारात निदर्शने केली.
वादाच्यावेळी सोसायटीतील रहिवासी असलेल्या मंत्रालयीन अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी घरात धूप अगरबत्ती लावणाऱ्या लता कळवीकट्टे यांना उद्देशून ‘तुम्ही मराठी लोक घाणेरडे असता. तुम्ही मटण-मासळी खाता. तुम्हा मराठी लोकांची इमारतीत राहण्याची पात्रता नाही,’ असे बोलून लता यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात शेजारी राहणारे धीरज देशमुख यांनी शुक्ला आणि कळवीकट्टे यांना ‘तुम्ही भांडू नका. आपसात वाद मिटवा. आणि मंत्रालयीन अधिकारी शुक्ला यांना आपण सरसकट मराठी लोकांना अपमानित करू नका, असा सल्ला दिला.
देशमुख यांच्या बोलण्याचा राग येऊन शुक्ला यांनी ‘मी मंत्रालयात कामाला आहे. मला मराठीचे सांगू नका. तुमच्यासारखे ५६ मराठी माझ्या समोर झाडू मारतात. मी मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून एक फोन आणला तर तुमचे मराठीपण जाईल. थोडा वेळ थांबा तुम्हाला बघू घेतो,’ अशी धमकी देशमुख यांना दिली.
हे प्रकरण मिटले असे वाटत असताना, रात्रीच्या वेळेत शुक्ला यांच्या इशाऱ्यावरून दहा जण हातात काठ्या, धारदार शस्त्रे घेऊन आजमेरा सोसायटीत आले. त्यांनी देशमुख यांच्या भावाला, पत्नी आणि अगरबत्ती लावणाऱ्या लता कळवीकट्टे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत धीरज देशमुख जखमी झाले. याप्रकरणी धीरज देशमुख यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
सोसायटीत निदर्शने
शुक्ला यांनी मराठी लोकांचा अपमान केल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी सोसायटीतील रहिवासी गुरूवारी रात्री सोसायटीच्या आवारात जमून त्यांनी शुक्ला यांच्या निषेधार्थ निदर्शने केली. शुक्ला यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्ह्यातील कलम लावावे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी रहिवाशांनी केली. शुक्ला हे आपल्या वाहनावर लाल दिवा लावून फिरतात, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या. अखिलेश शुक्ला यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे. शुक्ला यांनी आरोप केला की, त्यांच्या पत्नीवर अगोदर हल्ला झाला, आणि नंतर त्यांच्या मराठी भाषिक मित्रांनी त्यांना वाचवले.
शुक्ला पुढे म्हणाले, “आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, मी स्वतःला मराठी भाषिक समजतो. वादादरम्यान देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आणि माझ्या पत्नीला केसांनी पकडून मारहाण केली.” शुक्ला यांनी यावेळी आपल्या जुन्या शेजारीपणाच्या वादाला राजकीय वळण देण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला. त्यांनी या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी केली आहे.
कोट
किरकोळ कारणावरून एखाद्या रहिवाशाला गंभीर जखमी केले गेले असेल तर ही प्रवृत्ती वेळीच ठेचणे गरजेचे आहे. पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा. मंत्रालयीन अधिकारी शुक्ला यांना पोलिसांनी अटक करावी. मनसे तीव्र आंदोलन करील.
प्रकाश भोईर (माजी आमदार, मनसे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *