बळीराम क्रीडा मंडळ ५१वा कबड्डी महोत्सव
मुंबई:- बंड्या मारुती मंडळ, अमर क्रीडा(काळाचौकी) यांनी संघर्षपूर्ण लढती नंतर पुरुष प्रथम श्रेणी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. शिवशक्ती मंडळ, लायन्स स्पोर्टस् देखील उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. बळीराम क्रीडा मंडळाच्या विद्यमाने “५१व्या कबड्डी महोत्सवानिमित्त” आंबेवाडी, काळाचौकी येथील बळीराम मंडळाच्या पटांगणावर हे सामने सुरू आहेत. काळाचौकीच्या अमर मंडळाने शिवनेरी सेवा संघाचा कडवा प्रतिकार ३२-३१ असा मोडून काढला. पूर्वार्धात लोण देत २०-१४ अशी आघाडी घेणाऱ्या अमरला उत्तरार्धात मात्र शिवनेरीने लोण ची परतफेड करीत चांगलेच जेरीस आणले. पण संघाला विजयी करण्यास ते असमर्थ ठरले. करण सावर्डेकर, आकाश डोंगरे अमर मंडळाकडून, तर यश राक्षे, जतिन विंदे शिवनेरी कडून उत्कृष्ट खेळले.
दुसऱ्या उत्कंठावेधक लढतीत बंड्या मारुती मंडळाने सिद्धीप्रभा फाउंडेशनला २५-२४ असे चकवित आपली धोडदौड सुरूच ठेवली. क्षणक्षणाला काळजाचे ठोके चुकविणाऱ्या या सामन्यात पहिल्या डावात १२-११ अशी नाममात्र आघाडी बंड्या मारुती संघाकडे होती. शेवटी याच गुणाचा त्यांना फायदा झाला. प्रणित देसाई, शुभम चौगुले यांच्या संयमी व धूर्त खेळीला या विजयाचे श्रेय जाते. सिद्धीप्रभाच्या ओमकार पवार, रुपेश साळुंखे यांनी अंतिम क्षणापर्यंत निकराची झुंज दिली. पण त्यांचे प्रयत्न वाया गेले. याच गटात शिवशक्ती मंडळाने यंग प्रभादेवीला ३१-२१ असे रोखत आगेकूच केली. विश्रांतीपर्यंत चुरशीने खेळाला गेलेला हा सामना नंतर मात्र थोडासा एकतर्फी झाला. वैष्णव सूर्यवंशी, विराज सोहनी यांच्या विश्रांतीनंतरच्या जोशपूर्ण खेळामुळे शिवशक्तीला हा विजय मिळविता आला. यश पवार, रुपेश किर यांनी यंग प्रभादेवी कडून विश्रांतीपर्यत उत्तम लढत दिली. नंतर मात्र त्यांचा खेळ कमी पडला. शेवटच्या सामन्यात लायन्स स्पोर्टस् ने जय दत्तगुरुचा ३६-२५ असा पाडाव केला. लायन्स संघाने दोन्ही डावात एक एक लोण देत आपला विजय निश्र्चित केला. मध्यांतराला १४-१२ अशी लायन्स कडे आघाडी होती. राज आचार्यच्या चतुरस्त्र खेळामुळे हे शक्य झाले. जय दत्तगुरुचा ऋतिक नागले चमकला.