विधान परिषदेत मागणी
ठाणे : शहापूर तालुक्यातील भातसानगर येथे नवोदय विद्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज नागपूर येथे विधान परिषदेत अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केली.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्यामार्फत ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भातसानगर येथे नवोदय विद्यालयासाठी जागा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ नवोदय विद्यालय सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र नवोदय विद्यालयासाठी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे.
ग्रंथपालांना दिलासा देण्याची मागणी
राज्य सरकारने ग्रंथपालपदासाठी शाळेत १ हजार विद्यार्थ्यांची अट ठेवली आहे. त्यामुळे अनेक ग्रंथपाल अतिरिक्त झाले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या सातत्याने घसरत असल्यामुळे शाळेत १ हजार ऐवजी ७०० विद्यार्थ्यांची अट ठेवावी. तसेच सहावी ते बारावीऐवजी पाचवी ते बारावीपर्यंतची विद्यार्थी संख्या निश्चित करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.
वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक नेमावेत
पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे जुन्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर परिणाम होत असून, नव्या महाविद्यालयासाठी प्राध्यापकांची भरती करावी, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली.