मुंबई : महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी उलटून ५ दिवस होऊन गेलेत तरी अद्यापही सर्व मंत्री बिनखात्याचेच आहेत. मंत्र्यांचे विभाग ठरत नसल्याने मंत्र्यांचे ना कामकाज ठरत आहेत… ना अधिकारी…
खातेवाटप जाहीर होत नसल्याने विरोधकांकडून देखील तोंडसुख घेतलं जातंय… मागील ५ दिवस होऊनही मंत्र्यांना विभाग मिळत नसल्याने विरोधकांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे…
अनेक आमदारांचा मंत्रिमंडळातून पत्ता कापल्यानंतर ही नाराजी प्रकर्षाने नागपुरात दिसली. आणि त्यात अनेक ज्येष्ठ आमदारांच्या चेहऱ्यांवर देखील नाराजी बघायला मिळाली. शपथविधीनंतर लगेच अधिवेशन असल्याने अनेक नव्याने मंत्री झालेल्यांचे कार्यकर्ते नागपुरातच असल्याने चांगले खाते न मिळाल्याने नाराजी दिसू शकते. अशात, मंत्र्यांना विभागाचे वाटप झाल्यानंतर मंत्री आणि कार्यकर्ते अधिवेशनातच उघड नाराजी व्यक्त करु शकतात.
मंत्री न झालेल्यांची नाराजी आणि अपेक्षित विभाग न मिळाल्याने नाराजी, अशी दुहेरी अडचण एकाच वेळी येण्याऐवजी वादळ शांत करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांचा दिसतोय. सोबतच, काही खात्यांसंदर्भात अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी जोरदार मागणी करताना दिसत आहे, त्यामुळे देखील खातेवाटपास उशिर होताना दिसतोय.
अधिवेशन 21 डिसेंबरला संपताच त्याचदिवशी रात्री किंवा 22 डिसेंबरला राजभवनाला पत्र पाठवलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. अधिवेशन संपल्याने नागपुरात कार्यकर्ते आणि मंत्र्यांचा गोतावळा नसेल… अशात, नाराजी असली तरी कोणाला लगेच प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि सोमवारी मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील अशी अपेक्षा आहे.