मराठी माणूस भडकला,शुक्लाचा माज उतरवला
नोकरीतून बडतर्फ
संपत्तीचीही चौकशी
कल्याण : मराठी माणसाच्या स्वाभिमानावर घाला घालणाऱ्या मुजोर अमराठी अखिलेश शुक्लाचा माज अखेर महाराष्ट्राने उतरवला. मराठी माणूस भडकल्यावर काय होते याची चुणूक शुक्लाच्या निमित्ताने अवघ्या देशाला दिसून आली. मुजोर शुक्लाने गुंडाकरवी मराठी कुटुंबाला मारहाण करीत शिवीगाळ केल्याप्रकणी अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच हा प्रश्न विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उपस्थित झाला होता. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी निवेदन देत आरोपीवर कारवाईचं आश्वासन दिलं होतं. सोबतच अखिलेश मिश्रा याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आल्याचीही माहिती दिली होती.
एमटीडीसीमध्ये कार्यरत असलेल्या अखिलेश शुक्ला याच्या कुटुंबीयांचा धूप पेटवण्यावरून शेजाऱ्यांशी वाद झाला होता. त्यानंतर अखिलेश शुक्ला याने १० ते १२ जणांच्या गुंडांचं टोळकं बोलावून सोसायटीमधील तीन जणांना मारणाह केली होती. या मारहाणीत अभिजित देशमुख, धीरज देशमुख आणि विजय कविलकट्टे हे जखमी झाले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तसेच दोन्हीकडून दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारींच्या आधारावर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या प्रकरणी वाद वाढल्यानंतर गायब असलेल्या अखिलेश शुक्ला याने सोशल मीडियावरून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. आपली पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, आपण स्वत:ला मराठी भाषिक समजतो, असा दावा केला होता. तसेच दोन शेजाऱ्यांमधील वादाला भाषिक रंग देण्यात आल्याचा दावाही त्याने केला. एवढंच नाही तर देशमुख कुटुंबीयांनी शिविगाळ केल्याचा तसेच आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोपही अखिलेश शुक्ला याने केला होता. मात्र आता पोलिसांना अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
…त्याचा माज उतरवला जाईल- फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रात मराठी माणसाचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. जे माज करतात त्याचा माज उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. अशा शब्दात मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माज दाखविणाऱ्यांना इशारा दिला.
मराठी माणूस कुणाच्या काळात बाहेर गेला, वसई-विरारला गेला याचा शोधही घ्यायला हवा. भाई माझे मित्र आहात तुम्ही आहात. मराठी माणूस 300 स्क्वेअर मीटरमध्ये राहतो. मोठ्या फ्लॅटमधे कोण राहतो, याचा शोध घायला हवा. उत्तर प्रदेश, बिहारमधून इथे आलेले लोक आपल्यासारखे मराठी उत्तम बोलतात. आपल्यासारखेच सण उत्सव साजरा करतात. मात्र, काहीजण चुकीचं बोलतात. त्यामुळे मुंबईच्या सोशल फॅब्रिकला धक्का लागतो. त्यांना ठणकावून सांगतो मराठी माणसावर अन्याय होऊन देणार नाही. प्रत्येकाला काय खायचं याचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. घर नाकारण्याचा अधिकार कुणाला नाही. एखाद्या समाजाला शाकाहार महत्त्वाचा वाटतो तर त्यांची संघटना तयार करु शकतो, योजना तयार करु शकतो. शाकाहार पुरस्कार करणारे कोणी असेल तर त्याबाबत तिरस्कार करण्याचे कारण नाही. मात्र याचा फायदा घेऊन कोणी भेदभाव करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. अशा तक्रारी आल्या तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. असेही फडणवीस म्हणाले.
सरकारला जमत नसेल तर…
राज ठाकरे
सस्नेह जय महाराष्ट्र,
कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला, गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची की नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही !
कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे.
आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो !
अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच ! ‘लाडकी बहीण’च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की, ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको, आई, बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का ? मंत्रिपदं महाराष्ट्राची उपभोगणार परंतू त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार ! तुम्हाला तुमचा मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात ? तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहित नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लखलाभ….
हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे, पण हिंदू म्हणून एकत्र येताना, प्रत्येक राज्यात तिथली भाषा, तिथली स्थानिक माणसं , तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नये. हिंदूत्व आम्ही देखील पुजतो परंतू हिंदूना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लगणार नाही हे देखील आपण पाहिले पाहिजे !
मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपीना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका.
मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे, त्यांनी या विश्वासाला सार्थ ठरावं. बाकी सरकारने पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी.