चालकाचे नियंत्रण सुटून नौदलाची स्पीड बोटीची प्रवासी फेरी बोटीशी टक्कर होऊन मोठा अपघात घडल्यामुळे मुंबईमध्ये चौदाजण मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, बोटींवर पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट, रिंग बोयाज उपलब्ध नसणे, जीर्ण आणि वयोमान झालेल्या बोटींचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करणे, असे अनेक मुद्दे प्रकर्षाने समोर आले आहेत. पर्यटकांव्यतिरिक्त कामानिमित्त दररोज बोटीने ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी असते. पोलिस, नौदल तसेच अन्य यंत्रणांनाही ते माहीत असते. असे असले तरी, एखादा मोठा अपघात होईपर्यंत रस्ते, विमान वाहतूक असो वा जलवाहतूक; नियमांकडे कुणी फारशा गांभीर्याने पहात नाही. कॅनडा, जर्मनीहून पर्यटनाला आलेल्यांना किंवा इतर भारतीयांना आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे परवा माहीत नव्हते. बुधवारचा दिवस ‘नीलकमल’ या फेरी बोटीतील प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला. बुधवारी दुपारी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून ‘नीलकमल’ ही प्रवासी बोट घारापुरीकडे निघाली होती. या बोटीमध्ये शंभरपेक्षा अधिक प्रवासी होते. त्यात 20 लहान मुलांचाही समावेश होता. या बोटीची क्षमता खलाशांसह ऐशी प्रवाशांची असताना वीसजण जास्त घेतले होते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीतून जाणाऱ्या प्रत्येकाने जीवन रक्षक जॅकेट घातले पाहिजे. बोटचालकाची ती जबाबदारी आहे; परंतु ‘नीलकमल’मध्ये जॅकेट असूनही कुणीच घातली नव्हती, हे 14 जणांचा जीव गेल्यानंतर आपल्याला समजले आणि आता मुंबईत ‘लाईफ सेव्हिंग जॅकेट’ची सक्ती व्हायला सुरुवात झाली. हा बैल गेला आणि झोपा केला, यातलाच प्रकार आहे.
चूक झाली तर मान्य करून त्यात दुरुस्ती करायची असते; परंतु नौदलालाही त्याचा विसर पडला. नौदलाच्या ‘स्पीड बोटी’ च्या धडकेने 14 जणांचा बळी गेला. प्रथम एक, नंतर तीन, त्यानंतर 13 आणि आता 14 जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले. आता नौदलाच्या या बोटीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी पहिले तीन तास नौदल आपल्या बोटीमुळे अपघात झाल्याचे नाकारत होते; परंतु ज्या भागातून ही बोट जात होती, तिथे अनेक फेरी बोटी होत्या. त्यावरच्या प्रवाशांनी नौदलाच्या बोटीच्या कसरती आणि ‘नीलकमल’च्या प्रवासाची ध्वनिचित्रफीत काढली होती. अतिशय वेगाने चाचणी घेण्याच्या प्रयत्नांमध्ये नियंत्रण सुटून नौदलाची ‘स्पीड बोट’ फेरी बोटीवर धडकली, याचे अनेक साक्षीदार आहेत. शंभरपेक्षा अधिक लोक बुडाले; परंतु 14 वगळता अन्य लोकांना नौदल, मेरीटाईम बोर्ड, अनेक खासगी फेरी बोटींनी वाचवले. मदतीला हेलिकॉप्टर होते.
एका प्रवाशाने नौदलाच्या ‘स्पीड बोटी’चा चालक समुद्रात स्टंट करत होता, असा आरोप केला आहे. संशय आल्याने आपण व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यास सुरुवात केली आणि काही क्षणांमध्येच फेरी बोटीला त्या बोटीने जोरदार धडक दिली, असे एका प्रवाशाने सांगितले. घटनेच्या वेळी ‘नीलकमल’मध्ये लाईफ जॅकेट्सचा मोठा साठा उपलब्ध होता; मात्र बोट बुडू लागेपर्यंत कोणत्याही प्रवाशाने किंवा क्रू मेंबरने ते घातले नव्हते. या घटनेनंतर एका वरिष्ठ बंदर अधिकाऱ्याने सुरक्षेची अपुरी अंमलबजावणी आणि फेरी ऑपरेटर, नियामक प्राधिकरण यांच्याकडून दक्षतेचा अभाव असल्याची तक्रार केली. अशा वेळी लाईफ जॅकेट्स पुजायला ठेवली होती का, असा प्रश्न पडतो. सज्ज असलेली जेएनपीटी पायलट बोट वेळेवर बचावकार्यासाठी पोहोचल्याने आणखी मोठी जीवितहानी टळली. बोटींवर लाईफ जॅकेट्स ठेवणे बंधनकारक असले तरी आपत्कालीन परिस्थितीचा आल्याशिवाय प्रवासी ते क्वचितच परिधान करतात. हा सामान्य आळस घातक ठरू शकतो.
बोटीमधील सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट्स पुरवली गेली आहेत का आणि प्रवासादरम्यान त्यांनी ती वापरली आहेत का, याची अधूनमधून खात्री व्हायला हवी. त्यात अयशस्वी ठरलेल्या फेरी ऑपरेटरना दंड ठोठावला पाहिजे. स्थानिक बोट ऑपरेटर सुभाष मोरे यांनी आरोप केला की नौदलाच्या बोटी वारंवार धोकादायकपणे फेरी बोटीच्या अतिशय जवळून चालतात. याबाबत नौदल अधिकाऱ्यांकडे केलेल्या अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे. हे खरे असेल, तर नौदलाने आपल्या बोटचालकांना त्याबाबत दक्षता बाळगायला सांगितले पाहिजे. दुसरीकडे, ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीचा चालक फारच वेगाने बोट चालवत होता, असे प्रवाशांनी सांगितले. ‘नीलकमल’ ही फेरी ‘महेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ यांच्या मालकीची होती. पडते कुटुंबीयांकडून ती ऑपरेट करण्यात येत होती. यातील एक मालक सुनील पडते यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. अपघातातून वाचलेल्या नथाराम चौधरी यांनी ‘स्पीड बोट’च्या क्रूविरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. निष्काळजीपणा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांपैकी एक किंवा इतर चार प्रवाशांपैकी एक ‘स्पीड बोटी’चे नियंत्रण करत होते की नाही हे अद्याप कळले नसले तरी या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी मंडळाची स्थापना केली जाईल. ‘स्पीड बोटी’मध्ये नवीन इंजिन बसवल्यानंतर चार ‘ओईएम’ प्रतिनिधींसह सहाजणांनी त्याची चाचणी सुरू केली होती. तेव्हाच चालकाचे नियंत्रण सुटले आणि ‘नीलकमल’ या प्रवासी फेरी बोटीशी टक्कर झाली. या दुघटनेत भारतीय नौदलाचे महेंद्रसिंह शेखावत आणि दोन ‘ओइएम’प्रतिनिधी प्रवीण शर्मा आणि मंगेश यांचा मृत्यू झाला. ‘या दुर्घटनेमागील नेमके कारण समजून घेण्यासाठी चौकशी मंडळाची स्थापना करण्यात येईल. इंजिन कसे बिघडले ते आम्ही तपासू आणि या दुर्घटनेला इतर काही घटक कारणीभूत आहेत का ते ठरवू’, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेमुळे जल प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीतील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, बोटींवर पुरेशा प्रमाणात लाईफ जॅकेट, रिंग बोयाज उपलब्ध नसणे, जीर्ण आणि वयोमान झालेल्या बोटींचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करणे, बोटींची वाहतूक करताना नेमून दिलेल्या मार्गाचा अवलंब न करणे असे अनेक मुद्दे या घटनेनंतर प्रकर्षाने समोर आले आहेत.