नवी मुंबई : गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तकी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असून नमुंमपा शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने दिवा ऐरोली येथील नमुंमपा शाळा क्र. 48, 91, 120 याठिकाणी नमुंमपा शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी उत्साही सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला.
शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांच्या हस्ते, शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे सर्व प्र.विस्तार अधिकारी व केंद्र समन्वयक याठिकाणी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनासाठी इयत्ता 6 वी ते 8 वी, इ. 9 वी ते 12 वी तसेच दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक असे एकूण 06 गट होते. यामध्ये नवी मुंबईतील 10 केंद्रांतून उत्कृष्ट 41 प्रयोग प्रकल्प निवडण्यात आले होते. विद्यार्थी व शिक्षक यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमधून त्यांची सर्जनशीलता, नवनिर्मिती, सादरीकरण यांचे दर्शन घडले. परीक्षण करण्यासाठी आलेल्या परीक्षकांनी अत्यंत पारदर्शकपणे परीक्षण करून प्रत्येक गटातून एका उत्कृष्ट प्रकल्पाची निवड केली. उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रदर्शनास भेट देऊन सादर केलेल्या प्रकल्पांची पाहणी केली व विद्यार्थी – शिक्षकांशी संवाद साधला.
या नमुंमपा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे संपूर्ण नियोजन प्र. विस्तार अधिकारी तथा केंद्र समन्वयक ऐरोली  सुप्रिया पायरे यांनी ऐरोली गटातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यातून उत्तम रितीने केले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *