नवी दिल्ली : भारतीय मातीतील खो-खो आता कात टाकून पुढे जात आहे. खो खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI) ने पहिला वर्ल्ड कप १३ ते १९ जानेवारी या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय सुपरस्टार सलमान खान यांना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरात करण्यात आली. यावेळी खो-खो महासंघाचे अध्यक्ष श्री सुधांशू मित्तल, महासचिव एम. एस. त्यागी, तसेच भारतीय पुरुष आणि महिला संघांचे खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.
सलमान खान पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी खूप उस्ताही आहे. त्यांनी या खेळाची व आपली नाळ जुळली असल्याचे सांगितले. तसेच खो-खो सारखा आपल्या मातीतील खेळ जगभर पसरत असल्याचे पाहून आपल्याला खूप आनंद झाल्याचेही सांगितले.
मी पहिल्या खो खो वर्ल्ड कप २०२५ चा भाग आहे याचा मला अभिमान वाटतो! आपण सगळ्यांनी एकदा तरी खो खो खेळलेला असेलच त्यामुळे हि फक्त एक स्पर्धा नसून, या स्पर्धेमुळे भारताच्या मातीतील खेळाला, आत्म्याला, आणि सामर्थ्याला दिलेला सन्मान आहे” असे सलमान खान यांनी आपल्या संदेशात सांगितले. “हा एक चपळ खेळ असून, तो आता जगभरात लोकप्रिय होत आहे. चला, एकत्र येऊ आणि जागतिक स्तरावर खो खोचा उत्सव साजरा करू” असे त्यांनी पुढे म्हटले.
या खो खो वर्ल्ड कपमध्ये २४ देशांचे संघ सहभागी होणार असून हि स्पर्धा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इंडोर स्टेडियमवर होणार आहे. विविध देशांचे प्रतिनिधी येथे आले असून त्यांच्यासाठी प्रात्यक्षिक सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख खेळाडू प्रतिक वाईकर, आदित्य गणपुले, रामजी काश्यप, दिलीप खांडवी, सुयश गरगटे, गौतम एम.के., सचिन भार्गव, विशाल, अरुण गुणकी, प्रियांका इंगळे, मुस्कान, मीनू, नसरीन, रेश्मा राठोड आणि निर्मला पांडे आदी खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
ही स्पर्धा जगभरातील प्रेक्षकांसाठी एक रोमांचक अनुभव ठरणार आहे. भारतीय खो खो महासंघ पुरुष आणि महिला खेळाडूंना समान संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यामुळे दोन्ही गटांसाठी समान व्यासपीठ तयार केले आहे.
खो खो महासंघाचे अध्यक्ष श्री सुधांशू मित्तल यांनी सलमान खान यांचे आभार मानले आणि सांगितले की त्यांच्या उपस्थितीमुळे वर्ल्ड कपकडे सर्वांचे लक्ष वेधले जाईल. “सलमान खान यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मातीच्या या खेळासाठी दिलेला वेळ कौतुकास्पद आहे. त्यांचा खेळाकडे पाहण्याचा उत्साह प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण देश वर्ल्ड कपकडे आकर्षित होईल याची आम्हाला खात्री आहे,” असे त्यांनी सांगितले.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) अधिकृतपणे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या या खो वर्ल्ड कपला पूर्ण पाठिंबा दिला आहे.