माणिकराव कोकाटेंचा टोला
हरिभाऊ लाखे
नाशिक -सरकार स्थापन होऊन ४ दिवस झालेत, दम तर काढला पाहिजे. छगन भुजबळांना जे वाटतं ते त्यांनी मागावे. मला वाटतं भुजबळांनी देशाचा पंतप्रधान व्हावे. मला काय वाटतं असेच थोडी होते. जशी मागणी असेल, नेतृत्वाला विचार करायला संधी मिळेल तसे पुढे होते. आम्ही ५ टर्म थांबलो, २० वर्ष तुम्ही मंत्रिमंडळात होतात आम्ही काही बोललो का? पक्ष वेगळा झाला तरी मंत्रिपद दिले तेव्हा आमच्यापैकी कुणी येऊन माध्यमांना नाराज आहोत असं सांगितले का? बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल हा होत असतो असं सांगत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी छगन भुजबळांना खोचक टोला लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यात भुजबळ समर्थक ओबीसी संघटनांची आज बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, राजकारणात बदल स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. लोकसभेच्या काळात अनेक लोकांनी निर्णय घेतला. आता लावलेले पोस्टर्स कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. मला विचारून पोस्टर लावलेले नाहीत. माझ्या मतदारसंघात अनेक कार्यक्रमात भुजबळांचे फोटो मी लावलेच आहेत. त्यामुळे सिन्नरमध्ये जे बॅनर लागलेत त्यात भुजबळांचा फोटो नसेल तर तो माझा दोष नाही, कार्यकर्त्याचा आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच अजितदादांचा वादा पक्का आहे. एखादी गोष्ट बोलली तर त्यातून मागे फिरत नाहीत. मी दादांनाच सिन्नरला उभे राहण्यास सांगितले होते. जेव्हा अजितदादांना गरज पडेल तेव्हा मी सिन्नरची जागा रिक्त करून द्यायलाही तयार आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आमचा दावा आहे. सर्वाधिक आमदार आमचे इथे आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे असं मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रत्येक माणसाला मंत्रिमंडळात सामावून घेणे शक्य नाही. मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित आहे. काहींना संधी मागे मिळाली, काहींना संधी आता मिळाली. एकाच व्यक्तीला सारखी सारखी संधी दिली तर बाकीच्यांना कधी मिळणार आहे? अनेक आमदार ५-६ टर्म निवडून आलेत तरी त्यांना संधी नाही. त्यामुळे दुसऱ्यांना संधी मिळाली पाहिजे हा विचारही आपण केला पाहिजे. त्यामुळे भुजबळ तो विचार करतील असं मला वाटते असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.