– सहा हजारहून अधिक नागरिकांच्या उत्साही सहभागातून
नवी मुंबई : स्वच्छतेमधील नवी मुंबईचे मानांकन उंचाविण्याचा निर्धार करीत 6 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पामबीच मार्गावर आयोजित स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन उपक्रम यशस्वी केला. सकाळी ठीक 5.30 वा सुरू झालेल्या हाफ मॅरेथॉनमधील 21 किमी. अंतराच्या मुख्य गटात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: धावपटू म्हणून सहभागी होत नागरिकांसमवेत स्वच्छतेचा संदेश प्रसारित केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख श्री.कृष्णप्रकाश यांनीही 21 किमी. हाफ मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली.
सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर यांनी 21 किमी तसेच प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार यांनी 10 किमी. धाव यशस्वीरित्या पूर्ण केली. अति. आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री. शरद आरदवाड तसेच अनेक विभागप्रमुखांनी व अधिकारी, कर्मचारीवृंदाने 5 किमी. गटात यशस्वी सहभाग घेतला.
सकाळी 5.30 वा पहिल्या गटाची हाफ मॅरेथॉन सुरू होऊनही इतक्या मोठ्या संख्येने आणि उत्साहाने नागरिकांनी सहभागी होत हा स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉ़न उपक्रम यशस्वी केला त्याबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिव्यांगाच्या उत्साही सहभागाचा विशेष उल्लेख केला. आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करीत मॅरेथॉनमध्ये सहभागी होत दिव्यांग व्यक्तींनी आपल्यासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवल्याचे आयुक्तांनी म्हटले. स्वच्छ शहर या नवी मुंबईच्या ओळखीप्रमाणेच आरोग्यपूर्ण शहर हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आयोजित केलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल नागरिकांचे तसेच हाफ मॅरेथॉन आयोजनात सहयोग देणा-या लेट्स सेलिब्रेट फिटनेस व सकाळ माध्यम समुह आणि इतर सहयोगी संस्थांचे आयुक्तांनी आभार व्यक्त केले.
21 किमी., 10 किमी. आणि 5 किमी. गटाप्रमाणेच या हाफ मॅरेथॉनमध्ये 1 ते 3 किमी. च्या विशेष रन मध्ये 150 हून तृतीयपंथी नागरिक, 50 हून अधिक दिव्यांग, 40 हून अधिक ऑटिझम व्यक्ती, 50 हून अधिक अंध व्यक्ती यांनीही विशेष सहभाग घेतला. याशिवाय अनेक दिव्यांग 5 किमी. अंतराच्या रनमध्ये सहभागी झाले तसेच काही अंध व्यक्तींनी 10 व 21 किमी. अंतराच्या गटात सहभाग घेतला. 500 हून अधिक शालेय विद्यार्थीही यामध्ये सहभागी झाले होते.
स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये अक्षय पडवळ यांनी 21 किमी. अंतर हे 1 तास 13 मि. 54 से. वेळेत पूर्ण करून पुरूष गटातील विजेतेपद पटकाविले तसेच सुजाता माने यांनी 2 तास 4 मि. 12 से. वेळेत पूर्ण करून महिला गटाचे विजेतेपद संपादन केले. अशाचप्रकारे 10 किमी. अंतराच्या रनमध्ये ओंकार बैकर यांनी पुरूष गटात व कोमल खांडेकर यांनी महिला गटात विजेतेपद पटकाविले. 18 ते 35, 36 ते 45, 46 ते 54, 55 पुढील अशा चार वयोगटांमध्ये पुरूष व महिला यांना प्रत्येक गटात 3 पारितोषिके मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली.