निर्यातीतील अडथळे कायम
हरिभाऊ लाखे
नाशिक :अवकाळी पावसाने उत्पादनात घट झाल्यामुळे हंगामपूर्व द्राक्षांना (अर्ली) प्रति किलोस १४० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. आखाती देशांसह रशियात निर्यात सुरू झाली असताना लाल समुद्रातील तणावाने व्यापारी मार्गात अडचणी कायम आहेत. त्यामुळे युरोपीय बाजारात पोहोचण्यासाठी जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा घालावा लागत असल्याने अधिक दिवस लागत आहेत.
जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या तालुक्यांमध्ये हंगामपूर्व द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाळा अधिक लांबला. त्यातच अवकाळीने नुकसान झाले. परिणामी, द्राक्ष उत्पादनात घट होणार असल्याकडे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी लक्ष वेधले. हंगामपूर्व द्राक्ष उत्पादनातून ते दिसून येत असून उत्पादन कमालीचे घटल्याने या द्राक्षांना गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक दर मिळत आहे. लाल रंगाच्या क्रिमसनला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळाल्याचे बागलाण येथील उत्पादक खंडू भुयाने यांनी सांगितले. अन्य द्राक्षांना १४० ते १७५ रुपये दर आहे. या भागातील हंगामपूर्व द्राक्षे नाताळसाठी जगातील बाजारात पोहोचतात.
युरोपीय देशांसह ब्रिटनमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. लाल समुद्रातील तणावामुळे जहाजांना केप ऑफ गुड होपमार्गे जावे लागते. आधीच्या (लाल समुद्रातील) मार्गाने द्राक्षमाल सुमारे दीड हजार डॉलर (प्रति कंटेनर) भाड्यात २० दिवसांत युरोपीय बाजारात पोहोचत असे. आता दुसऱ्या मार्गाने माल पोहचण्यास ३५ ते ५० दिवस लागतात. शिवाय दुपटीहून अधिक भाडे मोजावे लागत असल्याचे मॅग्नस फार्म फ्रेशचे लक्ष्मण सावळकर यांनी सांगितले. मागील वर्षी लाल समुद्रातील मार्ग अकस्मात बंद झाला. अन्य मार्गाने माल जाण्यात बराच कालापव्यय होऊन काही माल खराब झाला. वाढीव वाहतूक खर्चाचा भुर्दंड पडला. या नुकसानीमुळे जहाज कंपन्यांशी करार करताना निर्यातदारांनी सावध पवित्रा घेतला. घटलेले उत्पादन व वाहतुकीचे प्रश्न यामुळे चालू हंगामात आतापर्यंत १०० कंटेनर द्राक्ष निर्यात झाले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी आहे. निर्यातीला प्रोत्साहन देणारी केंद्र सरकारची अनुदान योजना बंद आहे. या संदर्भात द्राक्ष निर्यातदार संघटना सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
कोट
प्रारंभी उत्पादनात काहीशी घट असली तरी फेब्रुवारी आणि मार्चनंतर नियमित द्राक्ष हंगाम सुरळीत होईल. एकूण उत्पादनाच्या तुलनेत १० टक्के द्राक्ष निर्यात होतात. त्यामुळे भारतीय द्राक्षांच्या एकूण निर्यातीवर कुठलाही परिणाम होणार नाही. जहाज कंपन्यांनी पर्यायी मार्गाने ३० ते ३५ दिवसांत कंटेनर युरोपात पोहचविण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे गतवर्षीसारखा त्रास होणार नाही, कमी वेळेत माल जाईल. मागील वर्षी १४ हजार ६०० कंटेनरमधून द्राक्ष निर्यात झाली होती. यावेळी निर्यातीचे प्रमाण तितकेच असेल, अशी सध्याची स्थिती आहे.
-विलास शिंदे (प्रमुख, सह्याद्री फार्म्स, नाशिक)
00000