अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शहरविकास विभागातील काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर असल्याने त्यांनी स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आहे. परिणामी अनेक कामांत ते अडवणूक करत असल्याने नागरिकांना त्रास होतो. दहा वर्षांहून अधिक काळ एकाच  विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना हटवा, अशी मागणी  आमदार संजय केळकर यांनी केली. त्यामुळे आता नगर विकास आणि ठामपा प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील विविध नागरी समस्यांना औचित्याच्या मुद्द्याद्वारे वाचा फोडली. पुरवणी मागण्यांच्या अंतर्गत झालेल्या चर्चेत विविध मागण्या करून काही सूचनाही केल्या. या अधिवेशनात शेवटच्या टप्प्यात श्री.केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागातील भोंगळ कारभारावर जोरदार टीका केली. वाढते महानगर आणि त्याला पुरेल अशा सुविधा देण्यासाठी अनेक अधिकारी सक्षम असले तरी काही अधिकारी लोकांची अडवणूक करत असल्याची बाब श्री.केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.शहर विकास विभागातील काही अधिकारी-कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी स्वतःचे साम्राज्य आणि हितसंबंधांचे जाळे या विभागात निर्माण केले आहे. त्यामुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची या विभागात अडवणूक केली जाते. याबाबत असंख्य तक्रारी नागरिक लोकप्रतिनिधींकडे करत असतात. शहर विकास विभागाचा कारभार लोककेंद्री होण्यासाठी येथे दहा वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात तत्काळ बदली करावी, अशी मागणी श्री. केळकर यांनी अधिवेशनात केली. केळकर यांच्या मागणीबाबत ठाणेकर नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून याबाबत नगरविकास आणि ठामपा प्रशासन कोणती भूमिका घेईल, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे, पण याबाबत समन्वय नसल्याने आजही अनेक ठिकाणी काहींना योजना हवी आहे तर काही विरोध करत आहेत. योजनेची अंमलबजावणी होण्यापूर्वी त्याची माहिती अधिकाऱ्यांनीच रहिवाशांना देणे आवश्यक आहे. परंतु अधिकाऱ्यांआधी बिल्डर झोपडपट्टी भागात घुसतात, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. अधिकारी जणू बिल्डरचेच सहकारी असल्याचे वागत असतात. ही योजना यशस्वीपणे राबवून सर्वसामान्यांना हक्काची घरे मिळण्यासाठी एसओपी तयार करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली.फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने फेरीवाल्यांची संख्या वाढून वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास होत असतो, नागरिक आणि फेरीवाल्यांमध्ये प्रसंगी हाणामाऱ्याही होत असतात. त्यामुळे येत्या १ जानेवारीपासून फेरीवाला धोरण लागू करण्यात यावे, अशी मागणी केळकर यांनी केली. ठाणे शहराला मिळणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा प्रश्नही गंभीर आहे. पिण्याचे पाणी इतर कामांसाठी वापरले जात असल्याने आणखी पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे अन्य वापरासाठी लागणारे पाणी देणाऱ्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केळकर यांनी केली. ठाणे शहर मतदारसंघातील ५० विहिरींची यादी सादर करण्यात आली असून या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी अधिवेशनात केली. अनेक वर्षे वीज जोडणीपासून वंचित रहिवाशांना वीज देण्यासाठी माझ्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला, मग पालिका प्रशासन विविध सुविधा देण्याबाबत चालढकल का करते, असा प्रश्न आमदार केळकर यांनी उपस्थित केला. ठाणेकरांना अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी ट्रान्सफॉर्मर उभारण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेने प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *