वडपे महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
ठाणे : माजिवडा पुलापासून सुरू झालेला ठाणे-वडपे महामार्ग लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे वडपे हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. त्यातील १३ किलोमीटर रस्ता रुंदीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू आहे.
माजिवडा ते साकेत पुलापर्यंत रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी दहा-पंधरा दिवसांत नाशिककडे जाणाऱ्यांना तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबई, अहमदाबाद, नवी मुंबईतून माजिवडामार्गे नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील कोंडीचा तिढा सुटणार आहे.
साधारणतः गेल्या दोन वर्षांपासून ठाणे-वडपे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दुतर्फा १२ पदरीचा हा महामार्ग आहे. त्यात दोन्ही बाजूला दोन-दोन पदरी सेवा रस्त्याचा समावेश आहे. यापैकी नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम जलदगतीने पुढे सरकत आहे. माजिवडा ते साकेत पुलाच्यादरम्यान असलेल्या मार्गाचे दोनपदरी सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण झाले आहे.
लोढा संकुलजवळ रस्त्याखाली सुरू असलेल्या मोठ्या गटाराचे कामसुद्धा पूर्ण झाले आहे. त्यावरून नाशिककडे जाणारी वाहतूक सुरू आहे. दरम्यान, याच मार्गिकेला लागून आणखीन दोनपदरी काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे कामदेखील रात्रंदिवस सुरू आहे. येत्या दहा-पंधरा दिवसांत ते होणार असल्याचे रचना कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तर, ठाणे ते वडपेदरम्यान सुरू असलेल्या या मार्गाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरून नाशिककडे जाणारी वाहतूक सुरू आहे. हे काम करण्यासाठी ४०० हून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे.
ठाणे-वडपे मार्गाच्या खालून ६० नाले जात असून त्यांचे काम पूर्ण झाले आहे. या नाल्यांतील पाण्याला भूमिगत मार्गाने पुढे जाण्यासाठी रस्त्याखाली मोठे नाले बांधले आहेत. तर, रस्त्याच्या खालून वाहनांना पलीकडे जाण्यासाठी सहा भूमिगत भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत.
खारेगाव टोलनाका पूर्णपणे सपाट
खारेगाव टोलनाका पूर्णपणे सपाट केला आहे. या ठिकाणी चारपदरी रस्ता रुंद केला आहे. येथूनच पुण्यासाठी वेगळा रस्ता निर्माण केला आहे. त्या रस्त्याचे ३०० मीटरचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याने तो पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला केला आहे. खारेगाव टोलनाक्यापासून हा मार्ग मुंब्रा बायपासने पुढे पुण्याकडे जातो. नाशिककडे जाणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिककडून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गाचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
कोट
कंपनीने हाती घेतलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिवस-रात्र कामगारांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत काम केले जात आहे. या मार्गावर सुमारे ७०-८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
– सचिन पाटील, अभियंता