अनिल ठाणेकर
ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २४व्या बिहार राज्य अधिवेशनाला २२ डिसेंबरला उत्तर बिहारमधील दरभंगा येथील हजारो शेतकरी आणि कामगारांच्या मोठ्या रॅलीने आणि जाहीर सभेने दमदार सुरुवात झाली. या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.संपूर्ण अधिवेशन स्थळ लाल झेंडे, लाल बॅनर आणि लाल फलकांनी सजवले होते. अधिवेशन स्थळाला माकपचे माजी सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे, तर सभागृहाला बिहारचे माजी पक्ष राज्य सचिव आणि केंद्रीय कमिटी सदस्य विजयकांत ठाकूर यांचे नाव देण्यात आले होते. दरभंगा हा त्यांचा मूळ जिल्हा होता.
राज्य सचिवमंडळ सदस्य श्याम भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या जाहीर सभेस पॉलिट ब्युरो सदस्य ए. विजयराघवन व डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कमिटी सदस्य खासदार आमरा राम, ए. आर. सिंधू, ललन चौधरी, अवधेश कुमार, राज्य सचिवमंडळ सदस्य आमदार अजय कुमार, आणि जिल्हा सचिव अविनाश ठाकूर यांनी संबोधित केले.सर्व वक्त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ‘पलटू राम’ नितीशकुमार सरकारच्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या, धर्मांध, जातपातवादी आणि हुकूमशाही धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच भाजप-एनडीएच्या विरोधात बिहारमधील सर्व डाव्या आणि धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले. वक्त्यांनी केरळच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारचा पर्याय लोकांसमोर ठेवला. जमीन आणि जनतेच्या इतर ज्वलंत स्थानिक समस्यांवरील संघर्ष तीव्र आणि व्यापक करावेत, धर्मांधता, जातपातवाद आणि नवउदारवादाच्या विरोधात प्रभावी राजकीय-वैचारिक मोहिमा कराव्यात, आणि बिहारमध्ये पक्ष संघटना व जनसंघटनांना जास्त बळकट करावे, असेही आवाहन वक्त्यांनी केले. बिहारचे हे राज्य अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत चालेल.