मुंबई : राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे पहाटेच्या वेळी गोठवणारा गारठा मुंबईत फारसा नसला तरी मागील दोन तीन दिवसांपासून गारवा जाणवत आहे. तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत शनिवारच्या तुलनेत रविवारी सकाळी किमान तापमान अल्पशी वाढ झाली असली तरी उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सकाळचा गारठा कायम आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी २१.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात २० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर येथील कमाल तापमान कुलाबा केंद्रात ३०.४ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३०.२ अंश सेल्सिअस इतके होते. सांताक्रूझ, गोरेगाव, कांदिवली पूर्व, मुलुंड पूर्व, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, भांडुप या परिसरात अधिक गारठा होता. दिवसभर कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कायम असल्याने उपनगरांमध्ये गारठा अधिक जाणवत होता. दरम्यान, डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत तापमानातील घट कायम राहणार आहे. मुंबई शहर तसेच उपनगरांत दिवसभर गार वाऱ्यांचा अनुभव येणार आहे. त्यामुळे पहाटे, दुपारी आणि सायंकाळीही थंडी राहील. त्याचबरोबर दाट धुके राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत कमाल तापमान ३०-३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५-१९ अंश सेल्सिअस इतके राहील. आकाश अंशत: ढगाळ असेल.
हवा वाईटच
गेले अनेक दिवस मुंबईच्या हवेची सरासरी नोंद ‘मध्यम’ असली तरी काही भागांतील हवा वाईट नोंदवली गेली आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार रविवारी मालाड, माझगाव, नेव्ही नगर कुलाबा , बोरिवली, देवनार आणि कांदिवली या भागात ‘वाईट’ हवेची नोंद झाली. तेथील हवा निर्देशांक अनुक्रमे २६४, २५०,२६८, २६८, २१०, २२४ इतका होता.