नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी १७ डिसेंबर २०२४ रोजी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या अपमान जनक द्वेषपूर्ण वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईतील सानपाडा येथील सर्वपक्षीयांनी संयुक्तपणे मोर्चाचे आयोजन केले होते, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी सानपाडा पोलीस स्टेशन समोरील चौकात झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत गृहमंत्र्यांनी द्वेषपूर्ण वक्तव्य करणे निषेधार्थ आहे. वास्तविक पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजाचे देव आहेत. त्यांच्याबाबत अमित शहा यांनी अपशब्द बोलणे शोभा देणारे नाही. म्हणूनच सानपाड्यामधील सर्व पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व रहिवाशांनी विभागात प्रचंड मोर्चा काढून, निषेधाच्या घोषणा देत, या घटनेचा जाहीर निषेध केला. या निषेध मोर्चात सानपाडामधील माजी नगरसेवक व शहर प्रमुख सोमनाथ वासकर, उपविभाग प्रमुख अजय पवार, बाबाजी इंदोरे, चव्हाण, गणेश ढोकळे पाटील, नयामुद्दिन खाजा पटेल, अंकुश जाधव, रुपेश ठाकूर, भरत खरात, मारुती विश्वासराव, सदाशिव तावडे आदी मान्यवर व सानपाड्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने सानपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले.