अनिल ठाणेकर
ठाणे : २४ डिसेंबरला ४०४ महसूल गावांमध्ये ‘पेसा दिन’ साजरा होणार आहे.पेसा कायद्याशी संबधित घोष वाक्य व बॅनर यांचा वापर करून पेसा कायद्याची जनजागृती करण्यात येणार असून अनुसूचित क्षेत्रांतील ग्रामस्थांनी पेसा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
केंद्र शासनाने २४ डिसेंबर, १९९६ रोजी पंचायती संबंधीचे उपबंध(अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे) अधिनियम, १९९६ अर्थात पेसा कायदा पारित केला आहे. पेसा कायद्याच्या निर्मितीला दि. २४ डिसेंबर रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने पंचायती राज मंत्रालयाच्या निर्देशाने हा दिवस “पेसा दिन” म्हणून मुरबाड, भिवंडी, शहापूर तालुक्यातील महसूल गावांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रांमध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा सदस्य, पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमताबांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी तसेच त्यांचा या कायद्याच्या अंमलबजावणीतील सहभाग वाढवून, ग्रामसभांचे सक्षमीकरण आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा ही विशेष उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पेसा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने गाव/ग्रामपंचायत पातळीवर मेळावा, प्रशिक्षण, कार्यशाळा आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत अंतर्गत सर्व पेसा गावातील संबंधीत घटकांनी सहभाग नोंदवावा तसेच ग्रामसभा सदस्यांनी जास्तीतजास्त उपस्थिती रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील, मुरबाड पंचायत समिती क्षेत्रातील ५५ ग्रामपंचायतींमधील १०१ महसूल गाव, भिवंडी पंचायत समिती क्षेत्रातील ४० ग्रामपंचायतींमधील ७३ महसूल गाव तर शहापूर पंचायत समिती क्षेत्रातील ११० ग्रामंपचायतींमधील २३० महसूल गाव असे एकूण ग्रामपंचायत २०५ तर महसूल गाव ४०४ येथे पेसा दिन प्रभावीपणे साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. पेसा कायद्याचे उत्तम ज्ञान असलेल्या व शक्यतो स्थानिक बोली भाषेचे जाणकार व्यक्ती, संस्था, अधिकारी यांनी उपस्थित सर्वांना पेसा कायद्याविषयी माहिती देणार आहेत, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी पंचायत समिती भिवंडी,शहापूर व मुरबाड येथील गट विकास अधिकारी, अधिनस्त विस्तार अधिकारी (पं), तालुका व्यवस्थापक(पेसा), तालुका प्रशिक्षण समन्वयक (पेसा), ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसभा मोबिलायझर व ग्रामस्तरीय कर्मचारी इ. सर्व यंत्रणेला पेसा दिन अंमलबजावणी उत्कृष्टपणे नियोजित करण्याबाबत निर्देशित केले आहे.