अनिल ठाणेकर
मुंबई : पोर्ट प्राधिकरणाच्या वडाळा येथील पोर्ट प्राधिकरणाच्या वसाहतीमध्ये काम करणाऱ्या सफाई कंत्राटी कामगारांना सप्टेंबर २०२४ पासून गेले तीन महिने कंत्राटदाराने पगार न दिल्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे. या उपासमारीत वडाळा येथे राहत असलेली एक महिला श्रीमती भागीरथी रंधवे हिचा मृत्यू झाला आहे. तिची तीन मुले आहेत. तिचा पती तर पूर्वीच दिवंगत झाला आहे. जर कंत्राटदार कामगारांचे पगार देत नसतील, तर मूळ मालक म्हणून मुंबई पोर्ट प्राधिकरणाने या सफाई कंत्राटी कामगारांचे पगार द्यावेत. अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी पोर्ट प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
सफाईवाले कंत्राटी कामगार मात्र नोकरी जाण्याच्या भीतीमुळे लेखी तक्रार करण्यास तयार होत नाही.कंत्राटदाराने कामगारांकडून युनियनचे सभासद होणार नाही असे लेखी लिहून घेतले आहे.
यापूर्वी देखील सफाईचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तीन-तीन महिने पगार दिला जात नव्हता. मात्र युनियनने सतत पाठपुरावा करून यापूर्वी कंत्राटी कामगारांना पगार मिळवून दिला आहे. आता पुन्हा कामगारांनी काम करून देखील कंत्राटदार कामगारांना पगार देत नाही. याची सातत्याने मागणी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या अध्यक्षांकडे केली आहे. सफाई कामाच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, नवीन कंत्राट पुन्हा मागवण्यात यावे. अशी मागणी युनियनच्यावतीने करण्यात आली आहे. कामगारांना वेळेत पगार न दिल्यामुळे काही कामगार कामावर येत नाहीत त्यामुळे पोर्ट प्राधिकरणाच्या वसाहतीमध्ये अस्वच्छता निदर्शनास येत आहे. यामुळे पोर्ट प्राधिकरण वसाहतीत राहणारे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला धोका आहे. म्हणून मुंबई पोर्ट प्राधिकरणाने मूळ मालक म्हणून या कंत्राटी कामगारांचे पगार ताबडतोब करावेत, तसेच यापुढे साफसफाई करण्यासाठी मुंबई पोर्टने स्वतःच कंत्राटी कामगार नेमावेत व पोर्ट प्रशासनानेच त्यांचे पगार द्यावेत, अशी मागणी युनियनतर्फे करण्यात आल्याची माहिती कामगार नेते.मारुती विश्वासराव यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *